
निवासस्थान नसल्याच्या कारणापायी दररोज करतात अपडाऊन
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून नांदगाव खंडेश्वर येथील तहसीलदार आणि दोन नायब तहसीलदार यांचे निवासस्थान बेवारस अवस्थेत पडलेले आहे. त्या वास्तूची स्थिती दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. एकेकाळी सुस्थितीत असलेली ही निवासी घरे आज मोठया प्रमाणात मोडकळीस आलेली आहेत. त्या त्याभोवती मोठया प्रमाणात झाडे, झुडपे वाढलेली असल्याने अक्षरशः या परिसराला जणू स्मशानभूमीचे स्वरूप आलेले आहे.
या निवासस्थानाच्या मागील बाजूस दिवाणी व फौजदारी न्यायालय असून पुढच्या बाजूस न्यायाधीशांचे निवासस्थान आहे. या दोन्ही ठिकाणांवर अधिकारी नियमितपणे वास्तव्य करीत असल्याने हा परिसर नीटनेटका आणि सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे.मात्र तहसीलदार हे मुख्यालयी राहत नसल्याने येथील सर्वच नायब तहसीलदार सुद्धा येथे वास्तव्यास राहत नाहीत.आणि दररोज अमरावती वरून अपडाऊन करतात त्यामुळे परिणामी ही रहिवासी घरे पडझडीला सामोरे जात आहेत.
यामुळे शासनानेच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.त्यामुळे नांदगाव खंडेश्वर येथील स्थानिक नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देऊन या सर्व निवासस्थानाचे नूतनीकरण करून तहसीलदार व नायब तहसीलदार यांना येथे मुख्यालयी वास्तव्यास राहण्याचे सक्तीचे आदेश द्यावेत.अशी मागणी केली आहे.तसे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.नांदगाव खंडेश्वर हे एक महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण असून येथील तहसीलदार व नायब तहसीलदार हे दररोज अमरावती येथून अपडाऊन करतात हे या तालुक्याचे मोठे दुर्दैव असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रशासकीय कामकाजासाठी अधिकारी सतत उपलब्ध असावेत यासाठी त्यांचे मुख्यालयी वास्तव्य हे अत्यावश्यक आहे.परंतु येथील तहसील कार्यालयातील कोणताही अधिकारी आणि कर्मचारी हा नांदगावात मुख्यालयी न राहता दररोज अपडाऊन करतात त्यामुळे रात्रीच्या वेळी एखादी अनुचित घटना तालुक्यात घडल्यास कोणताही अधिकारी अथवा कर्मचारी मिळत नाहीत त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या दिवसाची वाट बघावी लागते हे एक दुर्भाग्यपुर्ण बाबच म्हणावी लागेल.त्यानुसार याकडे जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून या निवासस्थानाचे नूतनीकरण करण्याचे आणि संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे सक्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी तालुका वासियांनी केली आहे.अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
भाऊसाहेब मस्त बातमी आहे त