
श्री पद्मकेश्वर देवस्थान, डोंगर यावलीच्या शेत जमिनीचे प्रकरण
महाराष्ट्र मंदिर महासंघाची चौकशी व कारवाईची मागणी
मोर्शी / तालुका प्रतिनिधी
श्री पद्मकेश्वर महादेव देवस्थान, डोंगरयावली, ता. मोर्शी, जि. अमरावती या 200 वर्षांहून अधिक जुने बांधकाम असलेल्या प्राचीन देवस्थानाच्या मालकीच्या शेतजमिनीवर बेकायदेशीररित्या आर्थिक लाभ घेण्यासाठी स्थानिक कब्जेदारांनी एक कट रचून महसूल विभागातील तत्कालीन तहसीलदार सागर ढवळे यांच्या संगनमताने महसूल अभिलेखात अनधिकृत फेरबदल केले आहेत. या प्रकाराला अनुसरून महाराष्ट्र मंदिर महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी, अमरावती व उपविभागीय अधिकारी, मोर्शी यांच्याकडे निवेदनाद्वारे संबंधितांवर तात्काळ चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
मौजा डोंगरयावली, सर्वे क्र. 60/1, क्षेत्रफळ 1 हेक्टर 14 आर असलेली जमिन ही श्री पद्मकेश्वर संस्थानच्या नावावर सन 1937 पासून अस्तित्वात आहे. ही मालमत्ता गणपत सखाराम कलाल यांनी संस्थानला दान दिली होती. तथापि, कब्जेदार गजानन नागोराव भामकर, प्रकाश भामकर व श्रीराम भामकर यांनी तहसीलदार, मोर्शी यांच्या सोबत संगनमत करून महसूल अधिनियमाच्या कलम 155 अंतर्गत बेकायदेशीर आदेश 20 जुलै 2022 रोजी प्राप्त केला. या आदेशाद्वारे 7/12 उताऱ्यावरून संस्थानच्या मालकीचे क्षेत्रफळ कमी करून त्यापैकी 0.81 हेक्टर क्षेत्रफळ कब्जेदाराच्या नावे नोंदवण्यात आले व संस्थांच्या नावावर फक्त 33 आर जमीन ठेवण्यात आली.
कायद्यातील तरतुदींचे स्पष्ट उल्लंघन
सदर आदेश देताना संस्थानला पक्षकार करण्यात आलेले नाही.ना जाहीरनामा प्रसिद्ध केला गेला, ना कोणतीही नोटीस बजावली.तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करत जमिनीचे अनधिकृत विभाजन झाले.कलम 155 अंतर्गत कोणतीही लेखन प्रमाण दोष चूक नसताना आदेश देण्यात आले.
बेकायदेशीर विक्री व संस्थानची हानी
वरील प्रकाराद्वारे कब्जेदारांनी संबंधित जमिन बेकायदेशीरपणे पुढे इतर व्यक्तींना विकून आर्थिक लाभ घेतले. दस्त क्र. 208 अन्वये जानेवारी 2024 मध्ये जमिनीची विक्री झाली असून यामुळे संस्थानचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मंदिर महासंघाची कारवाईची मागणी
महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या राज्य कोर कमिटीचे पदाधिकारी अनुप जयस्वाल व सदस्य विनीत पाखोडे यांच्या वतीने ही तक्रार जिल्हाधिकारी, अमरावती, उपविभागीय अधिकारी, मोर्शी यांच्याकडे सादर करण्यात आली आहे. एसडीओ मोर्शी यांच्याकडील अपील प्रकरणात कायदेशीर आदेश पारित होऊन संस्थानच्या नावावरील मूळ 7/12 उतारा पुन्हा पूर्ववत करावा, दोषींवर कायदेशीर कारवाई करावी व या गंभीर प्रकरणाची चौकशी त्वरित व्हावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. तसेच सदर संस्थान धर्मदाय आयुक्त प्राधिकरणाच्या परिपत्रक क्रमांक 518 नुसार नोंदणीकृत करण्याकरिता तसेच मालमत्तेचे संरक्षण करण्याकरिता धर्मदाय सह आयुक्त अमरावती यांना सुद्धा निवेदन देण्यात आलेले आहे.या संपूर्ण प्रकारामुळे मंदिर संस्थानच्या मालकीहक्कावर गदा आली असून शासनाने यामध्ये त्वरित लक्ष घालून कारवाई करावी, अशी कळकळीची मागणी मंदिर महासंघाकडून करण्यात येत आहे.