
जिल्हाधिकाऱ्यांच्या संवेदनशील निर्णयचा निराधारांना आधार
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
तपोवनात राहणाऱ्या कुष्ठरोगी लाभार्थ्यांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे विशेष शिबिर घेऊन फेसॲपद्वारे आधार सिडींग करण्यात आले. तसेच इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या सहायाने खाते उघडण्यात आले. यामुळे तपोवनातील कुष्ठरोग्यांचे बँक खाते उघडून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ होणार आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या संवेदनशीलतेने आणि निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपोवन येथील लाभार्थ्यांचे आधार बँक सिडींग करण्यात आले. यातील कुष्ठरोगी लाभार्थ्यांसाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँकेतर्फे फेसॲपद्वारे झिरो बॅलन्स आधार सिडींग खाते उघडण्यासाठी शिबिर पार पडले.
शिबिरामध्ये 90 लाभार्थ्यांचे फेसॲपद्वारे झिरो बॅलन्स आधार सिडिंग करण्यात आले.शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार क्रमांकाची जोडणी असलेले बँक खाते असणे आवश्यक आहे. मात्र कुष्ठरोगी लाभार्थ्यांच्या आधार प्रमाणीकरणाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबत इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने पुढाकार घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने कुष्ठरोगी लाभार्थ्यांच्या डोळ्यातील बुबुळाचा फोटो घेऊन बँक खाते उघडण्यात आले. तसेच आधार सिडींग करण्यात आले.तपोवन परिसरातील सुमारे 90 कुष्ठरोग्यांना बँक खाते आधार सिडिंग अभावी मागील सहा महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेचे अनुदान मिळत नव्हते.सामान्यांसाठी कदाचित ही एक छोटी तांत्रिक अडचण असू शकेल, पण या लाभार्थ्यांसाठी हा जीवन जगण्याच्या संघर्षातील मोठा अडथळा ठरला. कोणत्याही आधाराविना जगणाऱ्या या लोकांसाठी हे अनुदान म्हणजे एक आशेचा किरण, एक आधार. पण तोही सहा महिने दूर राहिल्याने अनेकांचे जीवन अधिकच अडचणीचे झाले होते.आधार संलग्नतेच्या नियमांनुसार डीबीटी प्रणालीद्वारे अनुदान देण्यासाठी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक एनपीसीआय प्रणालीत संबंधित बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. अनेक लाभार्थ्यांचे आधार कार्ड जुनी बँक खाती किंवा निष्क्रिय खात्यांशी जोडलेले असल्याने, अनुदानाच्या रक्कमा परत जात होत्या. यापेक्षा सर्वात महत्त्वाची अडचण होती कुष्ठरोगामुळे बोटे झडलेली असल्यामुळे त्यांच्या बोटांचे ठसे घेता येत नव्हते.या अडचणीमुळे लाभार्थ्यांच्या जगण्यात मोठा अडसर निर्माण झाला. शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि सामाजिकदृष्ट्या वंचित असणाऱ्या या घटकांसाठी बँक किंवा सीएससी सेंटरवर जाणेही अत्यंत अवघड होते.या परिस्थितीकडे सहानुभूती आणि संवेदनशीलतेने पाहत, जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी या समस्येकडे लक्ष देऊन या लाभार्थ्यांसाठी विशेष पुढाकार घेतला. त्यांनी इंडियन पोस्ट पेमेंट ऑफ इंडिया यांच्याशी समन्वय साधत, तपोवन येथेच डोळ्याचे बुबुळ स्कॅनिंग मशीनसह विशेष आधार लिंकिंग कॅम्प आयोजित करण्याचे निर्देश दिले. या निर्णयामुळे ज्यांना स्वतः बँकेत जाणे शक्य नव्हते, त्यांच्यापर्यंत ही सेवा पोहचवली गेली.हा कॅम्प म्हणजे केवळ एक सरकारी उपक्रम नव्हता, तर तो होता माणुसकीचा, स्नेहाचा आणि जबाबदारीचा एक संवेदनशील दस्तऐवज. जिथे सरकारी अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांच्या हातात आधार कार्ड घेऊन त्यांच्या डोळ्यात आश्वासक हास्य उमटवले. एकेक लाभार्थ्यांचे आधार क्रमांक बँकेत संलग्न होताना, त्यांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा भविष्याविषयीची आशा दिसू लागली.”आम्हाला पुन्हा आपलं मानलं गेलं” असं एका वृद्ध लाभार्थीनीच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंनी सांगून टाकलं. या उपक्रमामुळे केवळ तांत्रिक अडथळा दूर झाला नाही, तर समाजाच्या एका दुर्लक्षित घटकाला पुन्हा एकदा समाजाच्या मुख्य प्रवाहाशी जोडण्याचा एक मानवी पूल उभारला गेला.या सकारात्मक बदलाचे श्रेय जिल्हाधिकारी यांच्या संवेदनशील नेतृत्वाला, त्यांच्या कार्य तत्परतेला आणि पोस्ट बँकेच्या सहकार्याला आहे. तपोवनमध्ये भरलेला हा आधार कॅम्प नव्हे, तर एका नव्या आशेचा आधार बनला, ज्याने मानवतेची मूळ व्याख्या पुन्हा खरी करून दाखवली.