
आरोपी १२ तासाच्या आत जेरबंद,
मोर्शी पोलिसांची दमदार कारवाई
मोर्शी/ संजय गारपवार
शुक्रवार दि. 8 ऑगस्ट रोजी स्थानिक पोस्ट ऑफिस जवळ असलेल्या उपविभागीय राज्यस्व अधिकारी प्रदीप कुमार पवार यांचे सिंहगड नामक शासकीय निवासस्थान आहे. शुक्रवारी सकाळी प्रदीप कुमार पवार आपल्या खाजगी गाडीने सकाळी 10 वाजता अमरावती येथून मोर्शी येथे शासकीय निवासस्थानी आले होते. खाजगी गाडी निवासस्थानी उभी करून शासकीय गाडीने मोर्शी येथील उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात गेले होते. मोर्शी विभागात महा राजस्व अभियान सुरू असल्यामुळे ते कार्यालयीन कामाकरिता वरुड येथे दुपारच्या दरम्यान गेले होते.
शुक्रवारी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान कार्यालयीन कोतवाल दुर्गेश हा शासकीय निवासस्थानी आला असता घराच्या मुख्य दाराचे कोंडा कुलूप तुटलेले दिसले होते. त्याचप्रमाणे उपविभागीय अधिकारी पवार यांची खाजगी गाडी क्रमांक एम एच 29 ए आर 6600 या गाडीच्या डाव्या दरवाजाचा काच तुटलेला आढळून आला होता. कोतवाल दुर्गेश यांनी सदरची माहिती तत्काळ भ्रमणध्वनी वरून प्रदीप कुमार पवार यांना दिली त्याचप्रमाणे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुद्धा दिली. तहसीलदार नायब तहसीलदार व अन्य कर्मचारी तातडीने शासकीय निवासस्थानी आले. त्यांनी ही माहिती मोर्शी पोलिसांना दिली. काही वेळातच उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार शासकीय निवासस्थानी आले असता घराच्या आत जाऊन पाहिले असता घरातील सामान विखुरलेले आढळून आले होते. खाजगी चार चाकी गाडीची आतील डिक्की खोलून पाहिली असता डिक्कीतील परवाना प्राप्त असलेली खाजगी रिवाल्वर(बंदूक) चोरी गेल्याचे लक्षात आले त्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती.घटनास्थळी उपविभागीय अधिकारी संतोष खेडेकर, मोर्शी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल आठवले व अन्य पोलीस कर्मचारी यांनी घराच्या आवारातील शोध घेतला असता काहीच आढळून आले नोव्हते. घटनास्थळी ठसा तज्ञ, आणि अमरावती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बारकाईने तपास केला असता दरवाजाचे तुटलेले कुलूप आढळून आले होते. उपविभागीय अधिकारी प्रदीप कुमार पवार यांनी मोर्शी पोलिसांना फिर्याद दिल्यानंतर तपास चक्राला वेग आला होता. मोर्शी पोलिसांच्या वतीने शुक्रवारी 12 बारा ते 1 वाजता दरम्यान एका संशयीत इसमाला ताब्यात घेण्यात आले होते. शनिवारी सकाळी 10 वाजता गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे चोरी गेलेली रिवाल्वर पोलिसांनी ताब्यात घेतली होती. शहरातील विविध ठिकाणी सीसीटीव्हीचे फुटेज गोळा केल्यानंतर आरोपी अजय गोवर्धन दांडगे वय 33 वर्ष राहणार तळणी पूर्णा तालुका चांदूरबाजार जिल्हा अमरावती याची कसून चौकशी केली असता आरोपी अजय यांनी गुन्हा कबूल केला होता. आरोपी अजय दांडगे यांच्यावर वरुड, चांदूरबाजार,आसेगाव,, अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन व फैजलपुरा व बडनेरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला अटक करण्यात आली असून चोरी गेलेली बंदूक पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.सदरची कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राहुल आठवले, पोलीस उपनिरीक्षक आकाश शिवणकर, आर. टी. नांदगावकर, लक्ष्मण चिंचोले, गजानन सुंदरकर, योगेश सांभारे, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल बायस्कर, अथर्व कोहळे, अब्दुल हबीब यांनी केली आहे.आरोपी अजय गोवर्धन दांडगे याला दोन दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहातून वरुड येथील न्यायालयात तारखेवर हजर राहण्याकरिता सोडण्यात आले होते.सदर आरोपीवर घरफोडी यासारखे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहे.