दीक्षाभूमी स्मारक समिती अचलपूरकडून राष्ट्रपतींना निवेदन
अचलपूर / फिरोज खान
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती माननीय भूषणजी गवई यांच्यावर कोर्टात झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ अचलपूर शहरातील नागरिक, वकील, सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि दीक्षाभूमी स्मारक समिती अचलपूर यांच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या पार्श्वभूमीवर अचलपूरचे उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) यांना राष्ट्रपतींच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयात घडली संतापजनक घटना
दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालयात न्यायालयीन कामकाज सुरू असताना राजेश रघुराज किशोर (वय ७१, मयूर विहार, दिल्ली) या धर्मांध वकिलाने अचानक न्यायालयात गोंधळ घालत मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी “सनातन धर्म का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान” अशा प्रकारच्या चिथावणीखोर घोषणा देऊन न्यायालयीन प्रतिष्ठेचा अवमान करण्यात आला.

लोकशाही व न्यायव्यवस्थेवर गंभीर आघात
दीक्षाभूमी स्मारक समितीच्या प्रतिनिधींनी निवेदनात नमूद केले की, सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीवर हल्ला होणे ही फक्त व्यक्तीवरची नव्हे तर भारतीय न्यायव्यवस्था, लोकशाही आणि घटनात्मक मूल्यांवरील गंभीर आघात आहे.एक बौद्ध व दलित सरन्यायाधीशावर हल्ला होणे हे केवळ योगायोग नसून, पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या कटामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांचे खरे चेहरे उघडे करण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
सुरक्षाव्यवस्था बळकट करण्याची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी केंद्र सरकारने कठोर कायदे करावेत तसेच मुख्य न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सुरक्षेत तात्काळ वाढ करावी.याचबरोबर, त्यांच्या सेवानिवृत्तीनंतरही सुरक्षा प्रदान करावी, अशी मागणी उपस्थित नागरिकांनी केली.
निवेदन उपविभागीय अधिकारींकडे सादर
हा निषेधमोर्चा आणि निवेदन सादरीकरण कार्यक्रम अचलपूर तहसील कार्यालयासमोर पार पडला. निवेदन अचलपूरचे उपविभागीय अधिकारी (एस.डी.ओ.) यांना सुपूर्द करण्यात आले.या वेळी अचलपूर–परतवाडा परिसरातील नागरिक, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, वकील व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या निवेदनावेळी किशोर मोहोड, ॲड. प्रभाकर मोहोड, सुनील जवंजाळ, पुंडलिकराव वानखडे, सुधीर वानखडे, निलेश वानखडे, कैलास कलाने, राजेंद्र दाभाडे, शुभम तानोडे, राहुल गाठे, ॲड. मिलिंद थोरात, जीवन गायकवाड, रामकृष्ण तायडे, साहेबराव नितनवरे, विजय नितनवरे, अब्दुल जाकीर, अब्दुल गनी, प्रमोद कांबळे, ॲड. सुभाष चावरे, प्रा. डॉ. रमेश बडगे, दीपक दांडगे, राजेश हिवराळे, मोहम्मद अय फाक, शेख हबीब, दिलीप भाऊ गेडाम, ॲड. अमोल जवंजाळ,, निलेश पवार, बाळासाहेब वानखडे, तुळशीराम धुर्वे तसेच अनेक महिला सहभागी होत्या.
“अशा घटना पुन्हा घडू नयेत”
निवेदनकर्त्यांनी सांगितले की, हा प्रकार देशाच्या लोकशाहीला लाजिरवाणा असून न्यायव्यवस्थेवरील विश्वास डळमळीत करणारा आहे.“अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने कठोर कारवाई करावी, दोषींना कठोर शिक्षा व्हावी, आणि न्यायव्यवस्थेच्या सन्मानाचे रक्षण करावे,” अशी मागणी सर्व उपस्थितांनी एकमुखाने केली.हल्ल्याचा निषेध करत नागरिकांनी “जय भीम, न्यायाचा विजय असो” अशा घोषणा देत, देशभरातील न्यायप्रिय नागरिकांनी एकत्र येऊन लोकशाहीची प्रतिष्ठा अबाधित ठेवावी, असे आवाहनही केले.
