दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणाला अमरावतीतून दिला पाठिंबा
अमरावती/जिल्हा प्रतिनिधी
धनगर समाजाला घटनात्मक एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी तात्काळ करावी तसेच जालना येथील उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे आमरण उपोषण सोडवावे व त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देत या मागणीसाठी अमरावती जिल्ह्यातील सकल धनगर समाज आज अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय धडकला. जोरदार घोषणा दिल्या..सन २०१४ मध्ये बारामती येथे धनगर समाजाला एस.टी. आरक्षण मिळवून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते.पहिल्याच कॅबिनेट बैठकीत धनगर समाजाचे आरक्षण लागू करू,असे आश्वासन दिले होते.मात्र आजपर्यंत शेकडो बैठकांनंतर व आंदोलने करूनही तो शब्द पाळला गेला नाही असा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

जालना येथे दीपक बोऱ्हाडे हे दिनांक १७ सप्टेंबरपासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, जालना येथे आमरण उपोषणाला बसले असून आज त्यांच्या उपोषणाचा ६ वा दिवस आहे. तरीही शासनाने याची दखल घेतली नाही, अशी खंत व्यक्त करण्यात आली.”दोन दिवसांच्या आत धनगर समाजाचे आरक्षण लागू करून बोऱ्हाडे यांचे उपोषण सोडवावे, अन्यथा धनगर बांधवांच्या सूचनेनुसार राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल,” असा इशारा धनगर समाजाने दिला आहे. तसेच बोऱ्हाडे यांच्या जीवाशी काही अनिष्ट घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
