राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेत शिक्षक व संस्थांचा सन्मान
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना यांच्या वतीने राज्यस्तरीय एकदिवसीय शैक्षणिक परिषद तसेच “स्टेट आयडियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अवॉर्ड” आणि “स्टेट आयडियल टीचर अवॉर्ड” प्रदान समारंभाचे आयोजन रविवार, 1 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ. ए. आर. शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस, पुणे येथे अत्यंत उत्साहात पार पडले. राज्यभरातील शिक्षक, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती या परिषदेचे वैशिष्ट्य ठरली.या महत्त्वपूर्ण शैक्षणिक परिषदेचे अध्यक्षपद श्रीमती आबेदा इनामदार, अध्यक्षा, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, पुणे यांनी भूषविले. विशेष अतिथी म्हणून श्री खान नवेद-उल-हक इनाम-उल-हक, विशेष अधिकारी (उर्दू), बालभारती, पुणे हे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात श्रीमती इनामदार यांनी शिक्षण व्यवस्थेत शिक्षकांची भूमिका, नैतिक मूल्यांचे महत्त्व तसेच गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक शिक्षणाची गरज अधोरेखित केली.या परिषदेत राज्यातील निवडक शिक्षक व शैक्षणिक संस्थांचा गौरव करण्यात आला. यावेळी अब्दुल आरिफ अब्दुल खालिक, सहाय्यक शिक्षक, पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर, जिल्हा परिषद अमरावती यांना त्यांच्या दीर्घकालीन, निष्ठावंत व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सेवेसाठी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, नावीन्यपूर्ण अध्यापन पद्धती आणि समाजाभिमुख उपक्रम यांची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

परिषदेस डॉ. मझहर अहमद फारूकी, प्राचार्य, मौलाना आझाद कॉलेज, औरंगाबाद; श्री सय्यद इम्तियाज जलील, माजी खासदार, औरंगाबाद; श्री अख्तर हुसेन, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य अकादमी, मुंबई; श्री उमर कमाल फारूकी, बॅरिस्टर, लिंकन्स इन, लंडन; हाजी जुबेर मेमन, अध्यक्ष, महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्स; श्री मुकिम देशमुख, निवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली; श्री शारिक नक्शबंदी, संपादक-इन-चीफ, डेली एशिया एक्सप्रेस, औरंगाबाद; डॉ. मोईनुद्दीन फलाही, उपप्राचार्य, पूना कॉलेज; तसेच श्री कामिल शेख, मालक, आदिल पब्लिकेशन, पुणे यांची उपस्थिती लाभली.यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणांतून उर्दू शिक्षणाच्या सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. आधुनिक काळातील शैक्षणिक आव्हाने, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अध्यापनातील बदल, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि शिक्षक प्रशिक्षणाची गरज यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. शिक्षकांनी केवळ अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रप्रेम निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.परिषदेत शैक्षणिक अडचणी, त्यावरील उपाययोजना, शिक्षकांच्या प्रशासकीय समस्या तसेच उर्दू माध्यमातील शाळांच्या विकासासाठी आवश्यक धोरणांवर चर्चा झाली. राज्यातील विविध जिल्ह्यांतील शिक्षकांनी आपले अनुभव मांडले. या चर्चेमुळे परिषदेचा उपयोगी व मार्गदर्शक स्वरूप अधिक ठळक झाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुयोग्य पद्धतीने करण्यात आले तर आभारप्रदर्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले. यशस्वी आयोजनाबद्दल अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले.
