
चालकाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या एस.टी. महामंडळाच्या दाव्यांना तडा जात असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. यवतमाळ ते अमरावती महामार्गावर धावणाऱ्या एसटी बसचा चालक भरधाव वेगाने बस चालवताना मोबाईलवर बोलताना आढळून आला असून हा प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ होत असल्याचा गंभीर प्रकार उजेडात आला आहे.बुधवार दिनांक 11 जून रोजी यवतमाळ येथून अमरावतीकडे जाणारी बस (क्रमांक MH 14 LX 7574) ही नांदगाव खंडेश्वर मार्गे जात असताना बसमध्ये अनेक प्रवासी बसलेले असताना बसचालक मोबाईलवर संभाषण करत असल्याचे दृश्य प्रवाशांच्या निदर्शनास आले. चालकाचे हे वर्तन पाहून बसमधील सुज्ञ प्रवाश्यांनी त्वरित ही घटना आपल्या मोबाईलमध्ये कैद केली.
बस चालवताना मोबाईलवर बोलणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. एखादा सामान्य चालक असा प्रकार करताना दिसल्यास वाहतूक पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जाते. मात्र शेकडो प्रवाशांचा जीव घेऊन जाणाऱ्या एसटी बसचे चालक जर असा निष्काळजीपणा दाखवत असतील तर हा गंभीर प्रकार असून संबंधित चालकावर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे सदर प्रकारा बद्धल प्रवाष्यानी चालकास हटकले असता चालकाने प्रवाश्याशीच हुज्जतबाजी करून त्यांनाच दमदाटी केली त्यामुळे अश्या चालकावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी प्रवाश्यांकडून होत आहे.या प्रकारामुळे एसटी महामंडळाच्या सुरक्षित प्रवासाच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. हा प्रवाशांच्या जीवाशी थेट खेळ आहे. अशा बेजबाबदार चालकांवर कारवाई होणार की नाही ? असा संतप्त सवाल आता प्रवासी आणि जनतेतून उपस्थित केला जात आहे.या प्रकाराची गंभीर दखल घेऊन एसटी प्रशासनाने संबंधित वाहनचालकावर तात्काळ कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी समाजमाध्यमांवर आणि प्रवाशांच्यावतीने जोर धरू लागली आहे.