
हजारो भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ
माहूरगड / संजय घोगरे
विदर्भ आणि मराठवाड्यातील एक प्रसिद्ध अध्यात्मिक स्थळ असलेल्या श्री क्षेत्र माहूरगड येथील कैलास टेकडीवर दीप अमावास्येनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली. उंच पर्वतावर वसलेले हे जागृत देवस्थान म्हणजे कैलास महादेवांचे पवित्र स्थान असून, येथे दर अमावस्येला भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनासाठी येतात.
या पवित्र स्थळाचे विशेष महत्त्व आहे कारण याच ठिकाणी भगवान दत्तात्रेय महाराज व नवनाथ संतांची भेट झाल्याचे मानले जाते. तसेच भगावन कैलास महादेवाचे तपश्चर्यच संस्था असल्याने एक विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे हे स्थान “कैलास टेकडी” या नावाने प्रसिद्ध असून, अध्यात्मिक दृष्टिकोनातून अतिशय जागृत मानले जाते. याठिकाणी अनेक भक्तांना त्यांच्या मनोकामना पूर्ण झाल्याचे अनुभव आल्याने, दरवर्षी अमावस्येनिमित्त येथे हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.या वर्षीही दीप अमावास्येनिमित्त जवळपास १०,००० हून अधिक भाविक दर्शनासाठी आले होते. लांबून आलेले भाविक उंच पर्वत चढून कैलास महादेवांचे दर्शन घेत होते.भाविकांनी दीप अमावास्येच्या दिवशी विशेष पूजन, अभिषेक व महाआरतीत सहभाग घेतला. तसेच अनेक भक्तांनी कैलास टेकडीवर दिवे लावून पर्वत उजळून टाकला होता.कैलास टेकडी हे स्थळ केवळ धार्मिक दृष्टिकोनातून नव्हे तर निसर्ग सौंदर्याने नटलेले असल्याने पर्यटकांसाठीही आकर्षणाचे ठिकाण बनले आहे. धार्मिकतेचा स्पर्श आणि निसर्गाची साथ यामुळे येथील वातावरण अत्यंत प्रसन्न वाटते.स्थानिक भाविकांसह लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, अमरावती, अकोला आदी भागांतून आलेल्या भाविकांनी महादेवाचे दर्शन घेऊन समाधान व्यक्त केले. अनेकांनी वर्षभरात पुन्हा येण्याचे व्रत घेतले.कैलास टेकडीवरील दीप अमावास्येचा सोहळा भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्म यांचे प्रतीक ठरत आहे. अशाच प्रकारे दरवर्षी वाढत्या श्रद्धेसह या पवित्र स्थळी दर्शनासाठी भाविक येत आहेत आणि या पर्वतरांगांत अध्यात्माची जाणीव अधिक दृढ होत आहे.