शेलुगुडमधील शेतकरी बांधवांची शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी
नांदगाव खंडेश्वर/ तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शेलुगुड परिसरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक अतिवृष्टी व “यलो मोज़ेक आणि चारकोन्याड” रोगामुळे मोठ्या प्रमाणावर बाधित झाले असून पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादन मिळण्याची आशा संपुष्टात आली आहे.

सततच्या अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचून पिकांचे मूळ कुजले, त्यातच “यलो मोज़ेक” या विषाणूजन्य रोगाने पिकांवर हल्ला चढवला. परिणामी शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोयाबीन कापणीला अवघे काही दिवस उरलेले असतानाच हे नुकसान झाल्याने शेतकरी हताश झाले आहेत.यासंदर्भात शेलुगुडमधील शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन तहसीलदार,कृषि अधिकारी व आमदार यांच्याकडे निवेदन दिले आहे. निवेदनात शासनाने तातडीने शेतात पंचनामा करून झालेल्या नुकसानीची नोंद घेऊन पीडित शेतकऱ्यांना योग्य ती नुकसानभरपाई द्यावी,अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर सतिश शृंगारे,सौ. सारिका सुनिल बाटे, वर्षा संजय रंगाचार्य, एस. डी. रंगाचार्य, रमिंद्र काळे, चारुशिला सातंगे, घाटे, सावंत यांच्यासह शेलुगुडमधील अनेक शेतकरी बांधवांनी सह्या केल्या आहेत.शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीने लक्ष घालून मदत करण्याची मागणी केली आहे.
