
सामाजिक उत्तरदायित्वांतून अभियंते व कर्मचाऱ्यांनी केले आर्थिक व तांत्रिक मदतीचे वितरण
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अनावधानाने झालेल्या चुकीलाही वीज माफ करत नाही,त्यामुळे वीज उपकरणे हाताळतांना जाणीवपूर्वक काळजी घेतली पाहिजे असे आवाहन करत कार्यकारी अभियंता विजकुमार कासट यांच्या हस्ते आर्थीक आणि तांत्रिक मदतीचे वितरण करत वीज अपघाताने दुर्दैवी मृत्यू पावलेल्या प्रीया परिषे यांच्या कुटूंबाप्रति संवेदना व्यक्त करण्यात आल्या.पाण्याची मोटर सुरू करतांना अनावधानाने विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याने राजूरवाडी येथील रहीवासी असलेल्या प्रीया जानरावजी परिषे यांचा २ जून रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.तथापि कुटूंबातील कमावती व्यक्ती गेल्याने कुटुूंबावर दुःखाचे तसेच आर्थिक संकटाचे मोठे सावट आले आहे.परिषे यांच्या आई-वडिलांचे वय जास्त असून संपूर्ण कुटुंब अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत असल्याची परिस्थिती बघता, महावितरणच्या राजुरवाडी वीज वितरण केंद्र आणि मोर्शी उपविभाग अंतर्गत कार्यरत महावितरण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या जाणिवेतून ६३ हजार ५०० रूपयाची आर्थीक मदत केली.
तसेच भविष्यात अशा अपघातांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी घरातील संपूर्ण वायरिंगसाठी आवश्यक साहित्य स्विच बोर्ड, एम., वायर, इत्यादी विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आले.याप्रसंगी लेहगाव वीज वितरण केंद्राचे सहायक अभियंता कल्पेश देवांग, नेरपिंगळाई वीज वितरण केंद्राचे सहायक अभियंता कोकणे, तसेच राजुरवाडी वीज वितरण केंद्राच्या कनिष्ठ अभियंता मोना गणवीर व राजुरवाडी केंद्रातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.