
बँक प्रतिनिधींच्या लुटमारीच्या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना.
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
अमरावती ग्रामीण पोलीस घटकाच्या कार्यक्षेत्रात अलीकडील काळात स्मॉल फायनान्स बँकांचे कर्ज वसुली/वाटप प्रतिनिधी यांच्याकडून रोख रक्कम हिसकावून नेण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने, पोलीस प्रशासनाने या गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी बँक प्रशासनासोबत समन्वय बैठक आयोजित केली.
ही बैठक दिनांक २१ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५:०० वाजता मंथन हॉल,पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे, जोग स्टेडियम जवळ,अमरावती येथे पार पडली. या बैठकीस श्री. विशाल आनंद, पोलीस अधीक्षक,अमरावती ग्रामीण,श्री पंकज कुमावत, अपर पोलीस अधीक्षक, तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि जिल्ह्यातील विविध स्मॉल फायनान्स बँकांचे सुमारे ५० प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान, अलीकडे घडलेल्या लुटमारी व जबरी चोरीच्या घटनांचा सखोल आढावा घेण्यात आला. पोलीस व बँक प्रशासनातर्फे अशा घटनांवर प्रभावी आळा घालण्यासाठी योग्य ती दक्षता व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी प्रतिनिधींना सुरक्षा बाबत सूचना दिल्या व आवश्यक त्या उपाययोजनांचे मार्गदर्शन केले.
बँक प्रतिनिधींनी पोलीस प्रशासनास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. तसेच, त्यांच्या अडचणी व अडथळ्यांबाबतही प्रशासनासमोर मांडणी करण्यात आली.
या बैठकीद्वारे पोलीस व बँक प्रशासनामध्ये समन्वय वाढवून अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.