गुढीपाडवा–रामनवमी यात्रा महोत्सव उत्साहात संपन्न;अवधूत नाम प्रचारिका रेखा गायकवाड यांचे प्रवचन,यात्रा समिती व स्वयंसेवकांचा सत्कार, भव्य महाप्रसादाचे आयोजन
चांदूर रेल्वे (तालुका प्रतिनिधी)
श्री विठोबा संस्थान, सावंगा विठोबा तर्फे आयोजित गुढीपाडवा–रामनवमी यात्रा महोत्सव अत्यंत उत्साहात व शिस्तीत पार पडला. या यशाचे संपूर्ण श्रेय येथील विश्वस्त मंडळाच्या उत्कृष्ट नियोजनाला जात असल्याचे मत व्यक्त होत असतानाच, भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा पुरविण्यात प्रशासन व लोकप्रतिनिधी अपयशी ठरल्याचे चित्रही यावेळी पाहायला मिळाले, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले यांनी व्यक्त केली.श्री विठोबा संस्थान हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध संस्थान असून या ठिकाणी महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात.या संस्थानचा गुढीपाडवा रामनवमी यात्रा महोत्सव सर्वात मोठा असून अंदाजे ४ ते ५ लाख भाविक भक्त या स्थळी दर्शनासाठी उपस्थित असतात.या यात्रेचे आयोजन जिल्हा परिषद अधिनस्त होत असल्याने यात्रा नियोजनाचे दृष्टीने भाविकांकरिता आवश्यक सुविधांचा अभाव दिसून येत आहे,या यात्रेकरिता विशेष बाब म्हणून जिल्हा परिषदचे अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद करण्यात यावी.अवधूत महाराजांचे ‘ब’ वर्ग दर्जा प्राप्त असलेल्या या देवस्थानाकडे जाणारे रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असल्याने भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. तसेच गावाशेजारील नदीवरील पुलावर कठडा नसल्यामुळे भाविकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची नाराजी संस्थानचे अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, भाविकांच्या सोयीसाठी संस्थानच्या वतीने उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. रस्त्यापासून मंदिरापर्यंत हिरव्या नेटची सावली, लाखो भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही यंत्रणा, सुयोग्य दर्शन रांगा तसेच महाप्रसादाचे नियोजन यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला. या सर्व व्यवस्थेबद्दल पत्रकार भगोले यांनी संस्थानच्या कार्याचे कौतुक केले.या निमित्ताने आयोजित सत्कार समारंभात यात्रा महोत्सवात निःस्वार्थ भावनेने सेवा देणाऱ्या यात्रा समिती सदस्य व स्वयंसेवकांचा, तसेच वर्षभर प्रसादालयात सेवा देणाऱ्या देवबहिणींचा साडी-चोळी, शेला व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी सेवाभावी कार्याचे कौतुक करत, अशा कार्यातून समाजात सकारात्मक प्रेरणा मिळते, असे सांगितले.अवधुत नाम प्रचारिका रेखा गायकवाड यांनी सुमधुर वाणीने महाराजांचे ओवीवर साथसंगतसह प्रवचनाचे सादरीकरण केले.या कार्यक्रमानंतर भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा लाभ हजारो भाविकांसह ग्रामस्थांनी घेतला. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला होता.कार्यक्रमाचे संचालन संस्थानचे व्यवस्थापक रवि कलाने यांनी केले. प्रास्ताविक अध्यक्ष पुंजाराम नेमाडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सचिव अशोक सोनवाल यांनी मानले.यावेळी उपाध्यक्ष कृपासागर राऊत, सचिव अशोक सोनवाल तसेच विश्वस्त विनायक पाटील, गोविंद राठोड, फुलसिंग राठोड, चरणदास कांडलकर, प्रविण कुकडकर, लक्ष्मण राठोड, वैभव मानकर, स्वप्निल चौधरी यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर भगोले, विवेक राऊत, रितेश मुंधडा, संतोष वाघमारे, प्रकाश रंगारी, राजीव शिवनकर, प्रशांत सिसोदिया आदी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व पदाधिकारी, विश्वस्त व सेवकवर्ग यांनी विशेष परिश्रम घेतले.
