रुग्णाला उपचाराकरिता नांदगाव येवजी न्यावे लागले कारंजाला
लोकप्रतिनिधी विषयी नागरिकांमध्ये तीव्र संताप लाट
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवरा गावात शुक्रवारी (दि. 26 सप्टेंबर 2025) दुपारी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून प्रचंड पूर वाहू लागला. या पुरामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती . जवळपास चार तास पुलावरील पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करावी लागल्याने गावकऱ्यांची मोठी गैरसोय झाली.त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासना विरूद्ध गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता.

याच दरम्यान गावातील प्रतिष्टीत नागरिक मनोहर पाटील चोरे यांच्या पत्नीची अचानक तब्येत खालावली. त्यांना नांदगाव खंडेश्वर येथे उपचारार्थ डॉक्टरांकडे तातडीने नेणे आवश्यक असताना कोणतीही व्यवस्था नसल्याने कारंजा येथून त्यांच्या मुलींनी ऍम्ब्युलन्स पाठविली होती.मात्र पुलावरून वाहणाऱ्या प्रचंड पाण्यामुळे ही रुग्णवाहिका गावात पोहोचू शकली नाही. जवळपास चार तास प्रतीक्षेत ही रुग्णवाहिका रस्त्यावरच उभी राहिल्याने रुग्णाला दवाखान्यात नेण्यास खूपच विलंब झाला आणि त्यांची प्रकृती आणखी गंभीर झाली.या घटनेचा व्हिडिओ ग्रामस्थांनी काढला असून त्यात ऍम्ब्युलन्स पुलाजवळ थांबलेली स्पष्ट दिसते.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पुलाचे रुंदीकरण व उंची वाढविण्याची मागणी त्यांनी अनेकदा या विभागाच्या लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीकडे केली होती. परंतु या महत्वपूर्ण मागणीकडे त्यांनी डोळेझाक केली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. या रस्त्यावरून आणि पुलावरून वारंवार पूर येऊन शेतकरी, शाळकरी विद्यार्थी तसेच आजारी रुग्णांची मोठी गैरसोय होत असल्याचे लेखी निवेदनही देण्यात आले होते. मात्र या विभागाच्या लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.आजच्या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये या विभागाच्या लोकप्रतिनिधीं विषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.याबाबत गावकऱ्यांचे म्हणणे आहे की, प्रत्येक वर्षी या पुलामुळे धोक्याच्या घटना घडतात. पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. जर लवकरात लवकर पुलाचे काम हाती घेऊन पूर्ण झाले नाही, तर आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.याबाबत अनेकदा गावकऱ्यांनी जिल्हा प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि या विभागाचे लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधून घेत पुलाचे रुंदीकरण व उंची वाढविण्याचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
