प्राचार्य डॉ.अरविंद देशमुख यांचे प्रतिपादन
नांदगावपेठ / प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे अत्यंत विलक्षण व कल्पनातीत अशा कर्तृत्वाचा अद्भुत झरा आहे. अत्यंत कोवळ्या वयामध्ये सर्वत्र अंधकार, अन्याय, अत्याचार व निराशा काठोकाठ भरलेली असतांना शिवरायांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेची आपल्या सवंगड्यांसोबत भगवान शंकरांना स्मरून ‘हर हर महादेव’ च्या गर्जनेत शपथ घेतली. ही घटनाच अलौकिक आणि अद्वितीय आहे. छत्रपती शिवरायांनी ‘हे राज्य व्हावे, हि श्रीं ची इच्छा’ असेच नेहमी म्हटले. त्यांनी स्वतः कधीच राजा होण्याची आकांक्षा आपल्या मनात चुकूनही ठेवली नाही म्हणूनच मिर्झाराजे जयसिंग जेव्हा त्यांच्याशी लढायला आलेत. त्यावेळेला शिवाजी महाराज त्यांना म्हणाले की “तुम्ही कोणाशी लढत आहात. आपण दोघेही मोघलांशी लढू. हिंदवी स्वराज्य स्थापन करू. तुम्ही राजे व्हा .मी तुमचा सरदार होईल” हिंदवी स्वराज्य स्थापनेतील शिवरायांची भूमिका किती उदात्त व उन्नत होती.यावरून हे आपल्या लक्षात येईल. म्हणूनच मर्यादापुरुषोत्तम श्रीराम यांच्यानंतर सर्वांनी आदर्शभूत व्यक्तिमत्त्व कोणतं असेल तर ते छत्रपती शिवरायांचं आहे. म्हणूनच स्वामी विवेकानंद असं म्हणाले होते की “रामायण आणि महाभारत यांच्यातील सर्व उत्तम गुणांचा समुच्चय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होत”. अत्यंत किशोर वयात त्यांनी महिलेचा छळ केला म्हणून संबंधिताचे हातपाय कापून टाकण्याची शिक्षा दिली आणि लोकांच्या अंतःकरणात आपण सत्यप्रेमी, न्यायधिष्टित, स्त्रियांचा सन्मान करणारे, स्वराज्याबरोबर राष्ट्राचे देखील संरक्षण करणारे आहोत.

अशा प्रकारचा विश्वास निर्माण केला. म्हणूनच जिजाऊ आई साहेबांनी रामायण, महाभारत, विविध संतांच्या जीवनातील कथा सांगून शिवरायांना महाराष्ट्रात संपूर्ण बिघडलेलं चित्र बदलण्यासाठी घडवलं आणि शिवाजी महाराजांनी आपल्या अद्भुत पराक्रमाने ते सिद्ध करून दाखवल़. म्हणूनच त्यांच्याबद्दल म्हटल्या जातं ‘झाले बहु, होतील बहु पण याच्या सम हाच!!!’ स्वराज्यासाठी अनेक किल्ले बांधणाऱ्या व जिंकणाऱ्या शिवाजीमहाराजांचा जन्म किल्ल्यावर झाला व सर्वप्रथम तोरणा जिंकून आणि त्याची दुरुस्ती करून शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधलं. त्या तोरणा किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम सुरू असतांना मिळालेल्या सुवर्णमुद्रा सामान्य मजुरांनी हिंदवीस्वराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांना समर्पित केल्यात. कशा प्रकारची माणसे शिवाजी महाराजांनी निर्माण केली होती. याची कल्पना करणे देखील आपल्याला आजच्या काळात कठीण आहे. त्यासाठी शिवाजी महाराजांचे स्वतःचे चरित्र हे तितकंच उज्वल, देवनिष्ठ, देशनिष्ठ व धर्मनिष्ठ होतं हे आपल्याला आवर्जून लक्षात घ्यावं लागेल. म्हणूनच ते अशा पद्धतीचे कार्य आपल्या जीवनात करू शकले. केवळ पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य इतिहासामध्ये चिरस्मरणीय आहे. त्यांची तुलना करावी असे चरित्र आपल्याला शोधूनही सापडत नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वांमध्ये काय नव्हतं. सत्यता, त्याग, शौर्य, धाडस, व्यवहारचातुर्य, शक्ती, युक्ती, देवनिष्ठा,धर्मनिष्ठा, देशनिष्ठा, संतांविषयी प्रगाढ श्रद्धा, रयतेविषयी विलक्षण वात्सल्य इत्यादी अनेक उत्तमोत्तम गुणांचा उत्कट समुच्चय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होते. शहाजीराजांना विजापूरच्या बादशहानी कपटानी कैद केलं. आणि त्यावेळेला स्वराज्य की आपल्या आईचं सौभाग्य यापैकि कशाचे रक्षण करावे, असं बिकट संकट त्यांच्यासमोर उभा राहिलं.परंतु त्याही परिस्थितीत त्यांनी आपल्या शक्तीने, युक्तीने आणि अत्यंत कुशलतेने आपले वडील शहाजीराजांचेही प्राण वाचवले. स्वराज्य ही शाबूत ठेवलं व मोगलांचं कंबरड देखील मोडलं. ही घटना सामान्य नाही आणि म्हणूनच अशा प्रकारचा पराक्रम मानवी विचारा़च्या कक्षेच्या पलीकडची आहे म्हणूनच बऱ्याच जणांना शिवाजी महाराज हे ईश्वराच्या अवतार वाटतात परंतु शिवाजी महाराजांनी माणूस म्हणून हे संपूर्ण कार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांचे जीवन संपूर्ण मानव जातीसाठी सदैव प्रेरणादायी आहे. आपल्याला आपल्या विचारांच्या मर्यादांच्या खूप पुढे जाऊन छत्रपती शिवरायांच्या विचारसरणीचा, त्यांच्या मोहिमांचा, त्यांच्या दूरदृष्टीपणाचा आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याच्या त्यांच्या कार्याचा विचार करण्याची नितांत गरज आहे. एखादा राजा पावणे चारशे वर्षानंतरही जनतेच्या हृदयात परमआदराचे आणि निस्सीम श्रद्धेचे स्थान प्राप्त करतो. घराघरांमध्ये त्याची देवस्वरूपात पूजा होते. या त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपण सदैव वेध घेण्याची नितांत आवश्यकता आहे आणि म्हणून मनुष्य जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही अडचणीच्या प्रसंगी नामोहरम न होता, मनाने खचून न जाता, निराश न होता आपल्या मनाचं चार्जिंग करण्याचं विलक्षण सामर्थ्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रामध्ये आजही आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टीने शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे, असे अत्यंत प्रभावी प्रतिपादन प्राचार्य डॉ अरविंद देशमुख यांनी शिवमित्र परिवार व श्रीरामचंद्र संस्थान, नांदगावपेठ यांच्या वतीने दिनांक १९ फेब्रु.ला आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत असतांना केले. याप्रसंगी सुप्रसिद्ध व्याख्याते श्री.अक्षयजी चव्हाण यांनी शिवाजीमहाराज आपल्या जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये आजही आदर्श आहेत. अशा प्रकारची सु़ंदर मांडणी केली याप्रसंगी व्यासपीठावर भारतीय जनता पक्षाचे नेते व प्रसिद्ध समाजसेवक श्री.विवेक गुल्हाने श्री.योगेश ठवळी, श्री.पंजाबराव सुंदरकर, सौ.वंदनाताई भटकर, श्री.रोशन धनमोडे आदी मान्यवर उपस्थित होते.याप्रसंगी एकल पालक असलेल्या विद्यार्थ्यांना शिवमित्र परिवाराच्या वतीने शालेय साहित्याचे नि:शुल्क वितरण करण्यात आले. तसेच विविध स्पर्धात्मक, व्यवसायिक परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या गावातील तरुणांचा त्यांच्या मातापित्यासह यथोचित सन्मान करण्यात आला. भगवान प्रभू श्रीरामचंद्र व व शिवरायांच्या आरतीने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. पसायदान आणि प्रसाद वितरणाचे कार्यक्रमाची सांगता झाली.’ हरहर महादेव,जय भवानी! जय शिवराय !!’या घोषणांनी संपूर्ण परिसर या वेळेला दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाकरिता गावातील सर्वच क्षेत्रातील नागरिक, महिला, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. शिवमित्र परिवाराच्यावतीने श्री.ऋत्विक इंगोले, श्री.विलास तायडे,श्री. धीरज पोकळे, डोईफोडे पोटफोडे आदि सर्वच शिवभक्तांनी अथक परिश्रम घेतले.
