
अतिक्रमणधारकांना नोटीस सहकार्य केल्यास सन्मान
विरोध केल्यास कारवाईचा इशारा
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजा खेड़ पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेच्या आजूबाजूला अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध ठोस पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. यासंदर्भात अलीकडे पार पडलेल्या ग्रामसभेत एकमताने अतिक्रमण हटविण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.गेल्या काही वर्षांपासून खेड़ पिंपरी येथील जिल्हा परिषद शाळेभोवती स्थानिक नागरिकांनी अतिक्रमण केले असून शाळेच्या संरक्षण भिंतीवर ताबा मिळवून लोखंडी साहित्य लावून जनावरांचे गोठे तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे परिसरात दुर्गंधी चिखल व अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
शिवाय या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून मालवाहतूक व बस वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.शाळेच्या संपूर्ण परिसरात अतिक्रमण वाढत जाऊन ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पोहोचले आहे. काही अतिक्रमणधारकांना समज देऊनही त्यांनी अतिक्रमण हटवले नाही उलट बळजबरीने ताबा वाढवला गेला. या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतने महाराष्ट्र शासनाच्या आदेशांचा आधार घेत शाळेच्या अतिक्रमण मुक्तीसाठी एकमताने निर्णय घेतला.ग्रामसभा सरपंच श्री. मंगेश हंसराज कांबले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. पुष्पा प्रमोद चौधरी तसेच ग्रामस्थांनी सहभाग घेतला. शाळेच्या सौंदर्यीकरणासाठी व सुरक्षिततेसाठी संरक्षण भिंतीची दुरुस्ती करून परिसर स्वच्छ ठेवण्याचे ठरविण्यात आले.ग्रामपंचायतीने अतिक्रमणधारकांना अधिकृत नोटीस पाठवून त्यांच्या अतिक्रमणातील साहित्य हटवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसे न केल्यास संबंधित साहित्य जप्त करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे. तसेच जे नागरिक अतिक्रमण हटविण्यास सहकार्य करतील त्यांना येत्या १५ ऑगस्ट रोजी सन्मानित करण्यात येईल.मात्र जर कोणी कारवाईस अडथळा निर्माण केला किंवा अभद्र वर्तन केले तर महसूल आरोग्य व पोलीस विभागाच्या मदतीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा सरपंचांनी दिला आहे.या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून शाळा परिसर पुन्हा स्वच्छ सुरक्षित आणि सुशोभीत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.