
महावितरण कर्मचाऱ्यांच्या नॉन स्टॉप प्रयत्नामुळे काही तासातच वीज पुरवठा सुरू
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
रविवारी दुपारी झालेल्या वादळामुळे महावितरणचे अमरावती शहरात उच्च दाबाचे ८,लघूदाबाचे १० वीज खांब पडले,पाच रोहित्रे फेल झाली आणि ३० विविध ठिकाणी वीज वाहिन्या तुटल्या होत्या. त्यामुळे विस्कळीत झालेला वीज पुरवठा महावितरणच्या कर्मचाऱ्यांचा युध्दस्तरावरील प्रयत्नामुळे काही तासातच १००% पुर्ववत केला असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे यांनी दिली आहे.
वादळाचा दबाव प्रंचड असल्यामुळे नंदा मोटर्स,साई नगर,अकोली रोड आणि नवाथे या भागात वीज वाहिन्यावर मोठ -मोठी झाडे पडली होती.त्यामुळे ३३ केव्ही अकोली उपकेंद्रातून निघणाऱ्या ११ केव्ही नवाथे फिडरवरील ८ उच्चदाबाचे वीज खांब पडल्याने सांत वीज खांबातील उच्चदाब वाहिनीचे सात स्पॅन क्षतीग्रस्त झाले.त्याचबरोबर लघुदाब वाहिनीची १० पोल आणि २७ स्पॅन मधील वीज वाहिन्या तुटल्या. तसेच महानगरपालिका शाळा क्रमांक ६ ,दत्तवाडी,आदीवाशी होस्टेल ,पवन नगर आणि जोडमोड या ठिकाणावरील ५ रोहित्रे निकामी झाल्यामुळे नंदा मोटर्स,नरहरी मंगल धाम,नवाथे,महादेव खोरी,साईनगर,अकोली रोड,एमआयडीसी परिसर आणि रवीनगर भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता.
वादळ थांबताच कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे तसेच तीनही उपविभागातील अतीरिक्त कार्यकारी अभियंते यांच्या पुढाकाराने वीज दुरूस्ती कार्याला युध्दपातळीवर सुरूवात करण्यात आली. टप्प्या -टप्प्याने करण्यात आलेल्या या कामत प्रथम पेट्रोलिंग करून वीज यंत्रणेवरील पडलेले झाड,फांद्या या हटविण्यात आल्या,सोबत नादुरूस्त झालेल्या रोहित्राची तपासणी करून काल संध्याकाळ पर्यंत सर्व रोहित्रे बदलविण्यात आली.त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे व कंत्राटदार एजंन्सीचे वेगवेगळ्या टिम तयार करून उच्चदाब व लघूदाब वाहिनीसाठी लागणारे वीज खांब आणि वीज वाहिन्याची व्यवस्था करून उभारणीच्या कामाला तत्काळ सुरूवात करण्यात आली. दरम्यान विजांच कडकडाटाने फुटलेले इन्सुलेटर तपासणे आणि ते बदलविणे असे नानाविध काम सोबत सुरू करण्यात आले. त्यामुळे नवाथे वगळता इतर भागाचा वीज पुरवठा काल मध्यरात्रीपर्यंत सुरू झाला होता.आज सकाळपासून नवाथे फिडर उभारणीचे काम युध्दस्तरावर सुरू करून पूर्ण करण्यात आले असून किरकोळ तक्रारी वगळता अमरावती शहराचा १००% वीज पुरवठा पुर्ववत करण्यात आला आहे.
*वीज ग्राहकांनी कायदा हातात घेऊ नये:-
अधीक्षक अभियंता दिपक देवहाते
वीज पुरवठा खंडित होणे हे जेवढे वीज ग्राहकांना नकोशे आहे,तेवढेच महावितरणच्या अभियंते व कर्मचाऱ्यांनाही नकोशे आहे. परंतू नैसर्गिक आपत्तीचा परिणाम महावितरण यंत्रणेवर होतो हे पण बघणे महत्वाचे आहे. याशिवाय वीज वाहिन्यावरील पडलेले झाड बाजूला करणे,तुटलेल्या वीज वाहिन्या काढणे, तुटलेले पोल काढून त्या ठिकाणी नविन पोल उभारणे, निकामी झालेल्या रोहित्राच्या ठिकाणी नविन रोहित्र बसविणे याला काही कालावधी लागतो,त्यामुळे वीज ग्राहकांनी या काळात सहकार्य करावे , कायदा हातात घेऊ नये असे आवाहन अधीक्षक अभियंता दिपक देवहाते यांनी केले आहे.
👍