पाच महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतींच्या नियुक्त्या
सर्व विषय समित्यांवर महाविकास आघाडीचे वर्चस्व
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या प्रशासन व विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विविध विषय समित्यांच्या सभापतींची निवड आज शुक्रवार (दि. १९) रोजी तहसील कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या विशेष सभेत एकमताने करण्यात आली.या निवडीमुळे नगर पंचायतीच्या कामकाजाला नवसंजीवनी मिळणार असून शहरातील मूलभूत सुविधा व विकासकामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.या विशेष सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सौ. प्राप्ती मारोडकर होत्या.पिठासीन अधिकारी म्हणून वरूड नगर परिषदेचे मुख्याधिकारी गजानन भोयर यांनी कामकाज पाहिले.सहाय्यक पिठासीन अधिकारी म्हणून नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निवृत्ती भालकर यांनी जबाबदारी सांभाळली.या सभेत नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेत नगर पंचायतीच्या पाच प्रमुख विषय समित्यांच्या सभापतींची निवड करण्यात आली. त्यानुसार अर्थ व नियोजन समितीच्या सभापतीपदी नगर पंचायतीचे उपसभापती अब्दुल जमीर अब्दुल रहीम यांची निवड करण्यात आली. त्याच प्रमाणे वित्त व नियोजनासह विकासकामांसाठी निधीचे योग्य नियोजन,अंदाजपत्रक आणि विविध योजनांची अंमलबजावणी या समितीमार्फत करण्यात येणार आहे.पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या सभापतीपदी वासुदेव अवधुतराव लोखंडे यांची निवड करण्यात आली असून,शहरातील पाणीपुरवठा सुरळीत ठेवणे, पाणीटंचाईवर उपाययोजना करणे, नवीन नळजोडण्या,तसेच सांडपाणी व्यवस्थापन सुधारण्यावर या समितीचा भर राहणार आहे.आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी सौ. ज्योत्स्ना अमोल धवसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.शहरातील स्वच्छता व्यवस्था,कचरा संकलन व व्यवस्थापन,आरोग्य सेवा,साथीचे आजार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे यावर ही समिती विशेष लक्ष देणार आहे.सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी मो.रियाज मो. मुमताज यांची निवड करण्यात आली.शहरातील अंतर्गत रस्ते, गटारी, सार्वजनिक इमारती,नागरी सुविधा तसेच सुरू असलेली व प्रस्तावित विकासकामे वेळेत व दर्जेदार पूर्ण करण्याची जबाबदारी या समितीवर असेल.महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ.कांता गजानन लोमटे यांची निवड करण्यात आली असून,महिलांचे सक्षमीकरण, बालकल्याणाच्या योजना,शिक्षण, आरोग्य व पोषणविषयक उपक्रम प्रभावीपणे राबविण्यावर या समितीचा भर राहणार आहे.नगर पंचायतीच्या या सर्व विषय समित्या महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या असून, नगरपंचायत वर महाविकास आघाडीने आपली वर्चस्व स्थापित केले आहे.या महाविकास आघाडीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांचा समावेश आहे.या निवडीमुळे नगर पंचायतीतील सत्तेवर महाविकास आघाडीची पकड अधिक मजबूत झाली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.सर्व समित्यांच्या निवडीनंतर नवनियुक्त सभापतींचे नगराध्यक्षांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी नवनियुक्त सभापतींचे अभिनंदन करत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.नव्या समित्यांच्या माध्यमातून नांदगाव खंडेश्वर शहरातील पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महिला व बालकल्याण तसेच आर्थिक नियोजन या सर्वच क्षेत्रांत लोकाभिमुख,पारदर्शक व विकासाभिमुख कामकाज होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
