अमरावती/ जिल्हा प्रतिनिधी
सावर्डी येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही ६९ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूरला प्रस्थान करणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी अन्नदानाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात गावातील युवक व महिला मंडळाचा पुढाकार उल्लेखनीय ठरला.कार्यक्रमाचे उद्घाटन अमरावती जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार मा. बळवंतभाऊ वानखडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी सामाजिक ऐक्य व बौद्ध अनुयायांच्या बांधिलकीचे कौतुक केले. तसेच नागपूरकडे प्रस्थान करणाऱ्या बौद्ध अनुयायांसह सावर्डी ग्रामस्थांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छाही दिल्या.सकाळी सहा वाजल्यापासून गावातील युवक व महिला मंडळाचे कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत होते. यामुळे शेकडो बौद्ध अनुयायांनी या अन्नदानाचा लाभ घेतला.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या औचित्याने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सावर्डी गावात सामाजिक एकात्मतेचा सुंदर प्रत्यय आला. गावातील तरुणाई व महिलांनी दाखवलेल्या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.या अन्नदान उपक्रमामुळे सावर्डी गावाचे नाव पुन्हा एकदा सेवाभाव, ऐक्य आणि बौद्ध अनुयायांच्या जिव्हाळ्याच्या नात्याशी जोडले गेले आहे.
