
दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा 426 जणांचा नेत्रदानाचा संकल्प
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात नेत्रदान संकल्पामध्ये उच्चांक गाठला असून,राज्यपाल तथा कुलपति कार्यालयाने दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक जणांनी आपला नेत्रदानाचा संकल्प केला आहे.भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपति यांच्या कार्यालयाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाला तीनशे दात्यांचे नेत्रदान संकल्पपत्र भरुन देण्याबाबत कळविले होते. त्यानुसार कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वामध्ये विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांनी 426 अर्थात दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून विद्यापीठाच्या आरोग्य केंद्राकडे दिले व आरोग्य केंद्राने सर्व 426 जणांचे नेत्रदानाचे संकल्पपत्र राज्यपाल कार्यालयाला पाठविले आहे. यासाठी विद्यापीठ आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता थोरात व त्यांच्या चमूंनी अथक परिश्रम घेतले. कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी नेत्रदानाचे संकल्पपत्र भरून देणा-या सर्वांचे अभिनंदन केले आहे.