अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
‘आपले दुर्मिळ असे मनुष्य जीवन स्वतः करिता आणि संपूर्ण जगाकरता एक देणगी म्हणून सिद्ध झाले पाहिजे. त्याकरिता आपल्या जीवनाचे मार्गदर्शक म्हणून संत हेच सर्वार्थाने योग्य आहेत.कारण संतांकडे गेल्यानंतर आनंद, संतोष आणि समाधान या मनुष्य जीवनातील अत्यंत दुर्मिळ आणि सर्वांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आत्म सुखाची प्राप्ती होते. संपूर्ण महाराष्ट्र हा अशा संतांनी घडविलेला आहे. यांत प्रत्येक संतांनी आपल्या अलौकिक प्रतिभेसह आपलं अमूल्य असं अवतार कार्य समाज कल्याणाच्या दृष्टीने सिद्ध केलेले आहे. सर्व संतांनी समाजाला प्रामुख्याने सहिष्णुता शिकविली. परंतु सहिष्णुते सोबत समाजाला मोगल साम्राज्याच्या काळात होणाऱ्या अत्यंत विलक्षण अशा अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात प्रतिकार आणि जयिष्णु वृत्तीची अत्यंत गरज होती. ती गरज समर्थ रामदास स्वामींनी आपल्या अवतार कार्यातून पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी समाजाला ठिकठिकाणी हनुमंताची मंदिरे भरून शक्तीची उपासना शिकवली व अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात प्रतिकार करण्याचं सामर्थ्य प्राप्त करून दिले. समर्थ रामदास स्वामींच्या शिष्यांनी, महंतांनी, मठांनी सतराव्या शतकामध्ये जे धर्म जागरणाचे कार्य केले. त्याचा उपयोग हिंदवीस्वराज्य निर्मितीच्या कार्यात झाला. समर्थांनी त्या काळात संपूर्ण समाजात दैववादाचा प्रखर विरोध करून प्रयत्नवादाची स्थापना केली. त्याकरिता त्यांनी ‘यत्न तो देव जाणावा’ आणि ‘केल्याने होत आहे रे’ हा मूलमंत्र संपूर्ण समाजाला दिला. मानवी जीवन सार्थक करण्यासाठी आपण देवभक्ती सोबत देशकरिता देखील यथामती, यथाशक्ती झटलं पाहिजे. हे समर्थांनी आवर्जून समाजाच्या मनावर बिंबवलं. समर्थांनी स्वतः प्रपंच केला नाही परंतु त्यांनी संपूर्ण समाजाला अध्यात्माच्या नावावर प्रपंचाकडे डोळेझाक करण्यापासून परावृत्त केलं. समर्थांच्या ग्रंथांचे अध्ययन करून अनेक मोठ्या लोकांनीआपल्या जीवनात प्रेरणा प्राप्त केलेली आहे. त्यामध्ये दासबोध, आत्माराम,करुणाष्टके, मनाचे श्लोक इत्यादी ग्रंथ जीवनाचे सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन शिकवणारे आहेत. समर्थांचे सर्व ग्रंथ आणि कार्य सदैव प्रेरणादायी आहे. समर्थांनी मानवी जीवन उन्नत करण्यासाठी प्रभावी श्रवण कसे करावे, आपल्या स्वकिया़च्या काही चुका झाल्यास त्यांना कायमस्वरूपी दूर न लोटता, त्या चुका दुरुस्त करून पुन्हा त्यांचा स्वीकार करावा, सदैव आपल्या कार्याचं मूल्यांकन,पुर्नमुल्यांकन करावं. त्यापासून प्राप्त होणाऱ्या परिणामांची मिमांसा करावी व आपल्या कार्यपद्धतीमध्ये आवश्यक ती सुधारणा करावी. आपल्यातील आत्मपरीक्षण करून आपल्या अवगुणांची जाणीव करून घ्यावी व ते अवगुण प्रयत्नपूर्वक दूर करावेत, एका तरी चांगलं गूणाचा अत्यंत प्रयत्नपूर्वक आश्रय करावा, प्रपंच आणि परमार्थाचा सदैव समन्वय ठेवावा ,नशिबावर अवलंबून न राहता आत्यंतिक प्रयत्नाने प्रारब्धावर देखील मात करता येते. हा विलक्षण प्रयत्नवाद समर्थांनी संपूर्ण समाजासमोर मांडला. आहाराच्या बाबतीत देखील प्रत्येक व्यक्तीने जागृत असावे व सदैव श्रीमद् भगवद्गीता प्रणित सात्विक आहाराचा आपल्या भोजनामध्ये समावेश करावा. रोज काहीतरी चांगले लिहावे, वाचावे व चिंतन करावे. रोजच्या दिनचर्येमध्ये सूर्यनमस्कार इत्यादी व्यायाम प्रकारांचा समावेश करावा. सदैव आपल्या अंतरंगाकडे लक्ष द्यावे व आपले अंतरंग कसे शुद्ध होईल,यासाठी नियमित साधना व उपासना करावी. कुठल्याही क्षेत्रात अभ्यास करून प्रगट व्हावे. अन्यथा झाकून असावे. पण अभ्यासा अभावी प्रगट होऊन आपल्या व्यक्तिमत्त्वाचा व कार्याचा नाश करू नये. संगतीचा परिणाम प्रत्येक माणसावर होतो म्हणून सदैव मनाला सत्संगती विषयी बजवावे व चुकूनही वाईट संगतीचा अवलंब करू नये. सदैव स्वतःला आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रासाठी प्रशिक्षित करावे व आपल्या नंतर देखील अतिशय योग्य कार्यकर्त्यांची चमू त्या क्षेत्रात उभी करावी. जेणेकरून व्यक्त केल्यानंतर देखील ते कार्य अधिक जोमाने व चांगल्या पद्धतीने कार्य सुरू राहील. कुठल्याही सत्कार्याचा आपल्याला अहंकार होणार नाही. यासाठी आपल्या अंतःकरणात सदैव ‘राम कर्ता’ ही भावना ठेवावी म्हणजे भगवंताचं आपल्याला सर्व चांगल्या कार्यात भरघोस सहकार्य मिळतं व यश देखील प्राप्त होतं आणि अंतःकरणातलं आत्मसमाधान देखील वृद्धिंगत होतं. समर्थांची ही सर्व जीवनसूत्रे म्हणजे वर्तमान काळातील “उत्कृष्ट लाईफ मॅनेजमेंटचे” सर्वोत्कृष्ट पाठ आहेत” असे अत्यंत अभ्यासू प्रतिपादन प्राचार्य डॉ .अरविंद देशमुख यांनी श्री समर्थोपासक मंडळ व श्री गोपालकृष्ण मंदिर, अंबापेठ,अमरावती या ठिकाणी श्रीरामदास स्वामी महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित प्रवचनमालेत केले. याप्रसंगी परमश्रद्धेय मंदाताई गंधे या प्रामुख्याने उपस्थित होत्या . कार्यक्रमाचे संचलन श्री.रमेशपंत डांगे यांनी तर प्रास्ताविक, आभारप्रदर्शन श्री. शामराव कु-हेकर यांनी केले. कार्यक्रमाकरिता भागवताचार्य श्री.शामराव देशपांडे, श्री. कमलाकरराव वाळवेकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून आलेली अनेक साधक मंडळी यांसह अमरावती शहरातील अनेक गणमान्य स्त्री-पुरुष उपस्थित होते.
