रुग्णांचे हाल,अनेक मागण्या प्रलंबित.जिल्हा शल्य चिकित्सकाचे दुर्लक्ष.
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना उपचाराऐवजी हाल सहन करावे लागत आहेत. तालुक्यातून या रुग्णालयात दररोज सरासरी ४५० रुग्ण ओपीडीमध्ये तपासणीसाठी येत असूनही येथे औषधांचा साठा अपुरा आहे. त्यामुळे येथे बाहेरून औषधे आणली असता त्याची चार लाख रुपयांची बिले सी.एस. कार्यालयाने अद्याप काढलेली नसल्याने कुणीही येथे औषध पुरवठा करायला तयार नाहीत.परिणामी रुग्णांना खाजगी मेडिकलमधून महागड्या किमतीत औषधे घ्यावी लागत आहेत.
१०८ ॲम्ब्युलन्स बंद – गरीब रुग्णांची हेळसांड
येथील १०८ ॲम्ब्युलन्स ही नेहमीच बंद असल्याने रुग्णांना अमरावतीला खाजगी वाहनाने उपचारासाठी जावे लागत आहे. गरीब रुग्णांना फुकटचा भुर्दंड बसत असून ॲम्ब्युलन्समध्ये डॉक्टरदेखील नसतात. आमदारांनी दिलेली ॲम्ब्युलन्स फक्त शोभेची वस्तू ठरली आहे,असा नागरिकांचा आरोप आहे.येथे सध्या दोन ॲम्बुलन्स आहेत मात्र या दोन्ही बंद असल्याने येथे नवीन ॲम्बुलन्स उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत आहे.

विवाह नोंदणीची ऑनलाइन सेवाच नाही
या रुग्णालयात गेल्या दोन वर्षांपासून विवाह नोंदणी ऑनलाइन होत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नोंदणीचे सर्टिफिकेट अजूनही हाताने लिहून दिले जात आहे.यामुळे तालुक्यातील नागरिकांना विवाह नोंदणी करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
कर्मचारी वेळेवर उपस्थित नाहीत – पदे रिक्त
या रुग्णालयात २७ पैकी २३ पदे भरण्यात आली असली तरी वैद्यकीय अधीक्षक व दोन वैद्यकीय अधिकारी यांसह ४ पदे रिक्त आहेत. कार्यालयीन कर्मचारी नेहमी गैरहजर राहत असल्याने नागरिकांना वारंवार परत जावे लागते. याबाबत उपस्थित कर्मचारी नेहमी उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

वीजेचा खोळंबा – डी.पी.ची गरज
रुग्णालयात वारंवार वीजपुरवठा खंडित होत असून स्पेशल डी.पी.ची आवश्यकता आहे.याबाबत अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला परंतु जिल्हा शल्य चिकित्सकांनी याकडे अजून लक्ष दिलेले नाही.त्यामुळे येथे विजेची समस्या निर्माण झाली आहे
निधी मंजूर पण काम ठप्प
रुग्णालय परिसरातील लहानसहान कामांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ३० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे कोणतेही काम सुरू झालेले नाही. आणि याबाबत कुणीही माहिती द्यायला सुद्धा तयार नाहीत
निवासस्थान अपुरे,कार्यालयीन इमारत जर्जर
कर्मचाऱ्यांसाठी १० क्वार्टर व वैद्यकीय अधीक्षकांसाठी निवासस्थानाची आवश्यकता असूनही त्याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे येथील अधिकारी,कर्मचाऱ्यांना भाड्याने घर घेऊन राहावे लागत आहे किंवा अमरावती वरून अपडाऊन करावे लागत आहे.येथील सध्याची कार्यालयीन इमारत ही अत्यंत जुनी असल्याने ती ठिकठिकाणी गळते त्यामुळे कार्यालयीन साहित्य खराब झाले असून ती इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असल्याने नवीन प्रशस्त इमारत मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
