पथ्रोट / नितीन दुर्बुडे
अंजनगाव सुर्जी परिसरातील सागर कापूस इंडस्ट्रीमध्ये मंगळवारी सकाळी भीषण आग लागून मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली. या आगीत अंदाजे १५ हजार क्विंटल कापूस, ५० गाड्या सरकी तसेच ३०० ते ४०० कापसाच्या गाठींचा साठा जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज सूत्रांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास इंडस्ट्रीच्या परिसरात अचानक आग लागली. कापसाचा मोठ्या प्रमाणावर साठा असल्यामुळे आग काही क्षणातच वेगाने पसरली आणि अल्पावधीतच तिने भीषण रूप धारण केले. आगीची तीव्रता इतकी होती की मोठा कापूस साठा पूर्णपणे जळून खाक झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

घटनेची माहिती मिळताच दर्यापूर, अकोट आणि परतवाडा येथील अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. मात्र अंजनगाव नगरपरिषदेची अग्निशामक गाडी उशिरा घटनास्थळी पोहोचल्याची चर्चा परिसरात रंगली होती.सागर कापूस इंडस्ट्रीचे मालक लक्ष्मणकांत राठी, उदय राठी आणि जय राठी असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच या ठिकाणी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) चा कापूसही साठवून ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.घटनेची माहिती मिळताच रहिमापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आला. भीषण आग पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.दरम्यान, आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनीही मोठ्या प्रमाणावर सहकार्य केले. कापूस इंडस्ट्री संघटनेचे पदाधिकारी, नगरपरिषद अध्यक्ष अविनाश गायगोळे, आरोग्य सभापती प्रवीण नेमाडे तसेच इतर पदाधिकारी घटनास्थळी दाखल होऊन परिस्थितीचा आढावा घेताना दिसून आले.दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
