
जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांचे प्रतिपादन
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतून कुशल आणि अकुशल अंतर्गत विविध कामे घेण्यात येतात. यात अकुशलचा निधीचा प्राप्त राहत असल्याने यातून मजूरांची देयके अदा करावीत, देयके अदा करण्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यात यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात मनरेगा अंतर्गत सर्व यंत्रणांची कामकाजविषयक आढावा बैठक घेण्यात आली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र, उपवनसंरक्षक सुमितकुमार, उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्यासह तहसिलदार आणि गटविकास अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.जिल्हाधिकारी श्री. येरेकर म्हणाले, मनरेगामध्ये मस्टर देण्याचे अधिकार रोजगार सेवकांकडे देऊ नये. तहसिलदार यांनी त्यांच्या आखत्यारीत हे अधिकार ठेवावेत. येत्या 1 ऑगस्टपासून एक पेड माँ के नाम उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
त्यामुळे वृक्षलागवडीची कामे हाती घेण्यात यावी. तसेच मस्टर दिल्यानंतर रोजगार सेवकांकडून सात दिवसांच्या आत मस्टर जमा करून घ्यावे. मस्टर जमा होत नसल्यास देयके वेळेत होऊ शकली नसल्याने जिल्ह्याची कामगिरी खालावत आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मस्टर जमा करून पहिली आणि दुसऱ्या स्वाक्षरीसाठी पाठविण्यात यावे. मनरेगाअंतर्गत घेण्यात आलेली कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात यावा.मजूरांचे देयक जमा करण्यासाठी आधार सिडींग महत्वाची बाब आहे. आधार सिडींग आणि बँक खात्याला आधार जोडण्याची प्रक्रिया तातडीने करण्यात यावी. मजूरांचे खाते उघडण्यासाठी पोस्ट पेमेंट बँकेचे अधिकारी सकारात्मक आहेत. स्थानिक स्तरावर त्यांच्याशी संपर्क साधून खाते नसलेल्या मजूरांचे खाते उघडण्यात यावे. या खात्यामुळे मजूरांना अपघात विम्याचे संरक्षण मिळणार आहे. मनरेगामध्ये अकुशलचा निधी प्राप्त होतो. यात कुशलचा निधी प्राप्त झाल्याबरोबर कामे पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.