
महावितरण – औद्योगिक संघटनांची पार पडली बैठक
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
औद्योगिक ग्राहकांना अखंड व स्थिर वीज पुरवठा देण्यासाठी महावितरण प्रयत्नशिल असून, आगामी काळात औद्योगिक वीज सेवेला अडथळा ठरणारे ब्लॅक स्पॉट शोधून त्यावर कायमस्वरूपी उपाय योजना करण्यात येईल असे प्रतिपादन मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी दिले.
मुख्य कार्यालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार विद्युत भवन अमरावती येथे आज महावितरण आणि औद्योगिक संघटना यांची बैठक पार पडली. यावेळी अधीक्षक अभियंता दिपक देवहाते, कार्यकारी अभियंते प्रदिप पुनसे, अमित शिवलकर, राजेश घाटोळे, प्रफुल लांडे, उपविधी अधिकारी प्रशांत लहाने, सातुर्णा को. ऑप. इंडस्टीयल असोशिएशनचे अध्यक्ष विरेंद्र लड्डा, सचिव एम.आय.डी.सी. असोसिएशन आशिष सावजी, अतिरिक्त अमरावती एम.आय.डी.सी.नांदगावपेठ इंडस्ट्रीयालिस्ट असोशिएशनचे अध्यक्ष अफाक सुभेदार, सचिव जगदिश वाधवानी, रविकुमार डागा, व्ही.पी.बनारसे, नंदकिशोर पेटले, मंगेश चौधरी, निलेश काकीर्डे, , जावेद खान इत्यादी औद्योगिक ग्राहक उपस्थित होते.यावेळी औद्योगिक ग्राहकांशी झालेल्या चर्चेनंतर मुख्य अभियंता म्हणाले की, औद्योगिक ग्राहक हे महावितरणसाठीच नाही तर, जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असून, त्यांना दर्जेदार सेवा देणे ही महावितरणची जबाबदारी आहे.
त्यामुळे यापुढे औद्योगिक ग्राहकांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य राहणार असून दुरूस्ती कालावधी कमीत -कमी करण्यावर भर देण्यात येईल. याचबरोबर औद्योगिक ग्राहकांच्या मागणीनुसार सातुर्णा एमआयडीसीतील फिडर वेगळे करण्याबाबतही प्रयत्न केले जाईल. नांदगाव पेठ एम. लेआऊट वसाहतीसाठी महावितरणच्या आरडीएसएस योजनेत स्वतंत्र ३३ केव्ही उपकेंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. तथापि दरम्यानच्या काळात नांदगाव पेठ एमआयडीसीतील वीज समस्यावर तोडगा काढण्यासाठी विविध ठिकाणी एबी स्विच लावण्यात येणार असून वितरण पेट्या, किट- कॅट, आदीचे काम मेंटनंन्स आणि देखभाल दुरूस्तीच्या कामात तत्काळ हाती घेऊन ते दुरूस्त करण्याचे निर्देश मुख्य अभियंता यांनी कार्यकारी अभियंता यांना दिले.विदर्भ-मराठवाडा येथील औद्योगिक ग्राहकांना शासनाने इलेक्ट्रीसीटी ड्यूटी माफ केलेली आहे, परंतू अजूनही काही ग्राहकांना जर ही ड्युटी लागून येत असेल तर त्याबाबत एक ड्राईव्ह घेऊन सवलतीस प्राप्त ग्राहकांना ती सवलत दिल्या जाईल. तसेच औद्योगिक ग्राहकांना प्राधान्याने वीज जोडणी देण्यासोबत प्रत्येक महिन्याला औद्योगिक ग्राहकांसोबत बैठक घेऊन वीज सेवेशी निगडीत समस्या जाणून घेतल्या जाणार असल्याचे मुख्य अभियंता यावेळी म्हणाले.