नांदगावात निळकंठराव जेवडे गुरुजीचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा
श्री गुरुदेव परिवारातील जेष्ठ मंडळीची उपस्थिती
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे कार्य तसेच त्यांनी भारतात शांतता, सुव्यवस्था राखणे, समाज प्रबोधन करुन समाजाला अंधश्रध्देपासून परावृत्त करणे, स्वातंत्र्याच्या लढयात सहभाग घेऊन समाजाला स्वातंत्र्याच्या लढयात सहभागी होण्यास प्रवृत्त करुन स्वतः पुढाकार घेणे, जनजागृती या अशा अनेक समाज हिताच्या, देश हिताच्या कार्याची दखल घेऊन सरकारने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भारतरत्न पुरस्कार दयावा व या भागाचा खासदार म्हणून हा पुरस्कार मिळवून देण्याकरीता मी सतत प्रयत्नशिल असेल असे उदगार खासदार श्री अमरजी काळे यांनी नांदगाव (खंडेश्वर) येथील मा.श्री.निळकंठ जेवडे गुरुजी आजीवन प्रचारक गुरुकुंज आश्रम मोझरी यांचे सहस्त्रचंद्र दर्शन सोहळा कार्यक्रमात काढले.ते पुढे बोलतांना म्हणाले की जेवडे गुरुजी हे शिक्षक असल्याने त्यांनी आपल्या आयुष्यात राष्ट्रसंताच्या विचाराची प्रेरणा घेऊन आयुष्यभर राष्ट्रसंताच्या विचाराचे प्रबोधन समाजावर करण्याचे काम केले.ते व्यवसायाने सुध्दा शिक्षक होते. शिक्षकाची जबाबदारी खूप मोठी आहे.समाजात शिक्षक हा महत्त्वाचा घटक असून शिक्षक हा समाजच घडवत नाही तर समाजात तयार होणारी प्रत्येक पिढी ही सुसंस्कृत, सद्विचारी, कर्तबगार पिढी घडविण्याचे काम करते. एखादा डॉक्टर कडून थोडी फार चुक झाली तर रुग्णाला थोडाफार त्रास होईल, इंजिनिअर चुकला तर कामाची दुरुस्ती करता येईल पण शिक्षक शिकवितांना चुकले तर देशाची संपूर्ण पिढी चुकते व यात संपुर्ण देशाचे नुकसान होते. त्यामुळे शिक्षकाचे समाजातील स्थान हे अत्यंत महत्वाचे असून शिक्षकानी सुध्दा आपल्या शिक्षकी पेशाला धरुन तेवढयाच जबाबदारीने वागणे महत्वाचे ठरते.आज शिक्षकांमध्ये शिक्षकांच्या कर्तव्याबद्दल किंवा त्यांचे देशाच्या पिढी घडविण्यात जे महत्त्वाचे योगदान असते त्या योगदानाबद्दल पाहिजे त्या प्रमाणात समर्पण भाव दिसून येत नाही. नोकरी करतांना मी समाज घडवतो किंवा पिढी घडविणार त्यामुळे आपली जबाबदारी समाज घडविण्यात महत्वाची आहे याचा फारसा विचार होत नसून केवळ शिक्षक म्हणून नोकरी करणे किंवा नोकरी करणारी शाळा ही जाण्या-येण्याच्या सोयीची असावी, आपले कुटूंब शहरात असावे याकडेच जास्त कल असतो. शिक्षकी पेशाविषयी आजच्या शिक्षकांमध्ये समर्पण भावाचा अभाव हा समाजाच्या दृष्टीने घातक आहे. शिक्षक जर आपल्या कर्तव्याविषयी जागरुक असेल व देत असलेल्या शिक्षणातून एक सुसंस्कृत आणि मजबूत समाज घडण्याला वेळ लागणार नाही हे शिक्षकानी नेहमी जाणून असावे.खासदार अमरजी काळे व माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी जेवडे गुरुजी यांचा सहस्त्रचंद्र दर्शन सोहळयाच्या निमित्ताने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक म्हणून आयोजित कार्यक्रमात त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज आश्रमातील अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी श्री.लक्ष्मणराव गमे हे अध्यक्षस्थानी होते. या सोहळ्याचे उदघाटक श्री जनार्दनपंत बोथे गुरुजी हे होते. तसेच उपसर्वाधिकारीश्री.दामोधरपंत पाटील, प्रचार प्रमुख ह.भ.प. श्री प्रकाश महाराज वाघ, ह.भ.प. लक्ष्मणदास काळे, आचार्य श्री हरिभाऊजी वेरुळकर, ग्रामगीता जीवन शिक्षण परीक्षा विभागाचे अध्यक्ष श्री.गुलाबरावजी खवसे महाराज, अध्यात्म संस्कार विभाग प्रमुख डॉ. राजाभाऊ बोथे ही मंडळी मंचावर होती. यावेळी कुटुंबीयांनी जेवडे गुरुजी यांचे पाद्यपूजन केले. तसेच त्यांची पणती ध्रुविका सोबत वाढदिवस साजरा केला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष अभिजीतभाऊ ढेपे,श्री शिवाजी नांदगावकर, अंगदराव इतापुरे,अक्षय पारसकर,अमोल धवसे,फिरोज खान,सर्व जेवडे कुटूंबिय व त्यांचे आप्तस्वकीय नातलग व श्री गुरुदेव परिवारातील मंडळी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन ह. भ. प. चंद्रशेखर महाराज वैद्य यांनी व प्रास्ताविक डॉ. संजय जेवडे यांनी केले.
