नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत निवडणूक
नगराध्यक्ष पद महिला राखीव
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पद महिला राखीव जाहीर होताच शहरातील राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे.जणू काही संपूर्ण शहराचं राजकारणच आता घराघरात पोहोचलं असं दृश्य निर्माण झालं आहे.अनेक नेतेमंडळी आपल्या अर्धांगिनींना पुढे आणण्यासाठी चहाच्या कपातून ‘रणनीतीचे बुडबुडे’ तयार करत आहेत.काही जण तर सरळ म्हणतात.आमचं काम बायको पुढे नेईल नगराध्यक्ष पदाचं आरक्षण महिला वर्गासाठी आलं.आणि लगेचच पक्षांच्या कार्यालयात ‘पत्नी उमेदवार मोहीम’ सुरू झाली. काही ठिकाणी नेते स्वतः प्रचार करतात पण यंदा दिसत आहे की पत्नींसाठी तेच पती आता ‘कार्यकर्ते’ बनले आहेत.पक्षाच्या बैठकीतही एक नवा ट्रेंड दिसू लागला आहे. नेते महोदय बसलेले आणि बाजूलाच तिकीट मिळालं का गं? अशी पुटपुट चालू आहे.

शहरात सध्या या सगळ्या हालचालींमुळे लोकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आहे.चहाच्या टपरीवर तर चर्चा रंगली आहे या वेळी प्रचारासाठी पोस्टरवर फोटो बायकोचा पण मागे प्लॅनिंग पतीचं! काही तर विनोदाने म्हणतात.तिकीट मिळालं तर घरातही ‘नगराध्यक्षा’ आणि घराबाहेरही ‘नगराध्यक्षा’ – मग पतीचा रोल काय? केवळ प्रचार प्रमुख तरीही दुसऱ्या बाजूला काही पक्षांतील महिला आघाडीतील निष्ठावंत कार्यकर्त्या मात्र ठाम आहेत.आम्ही वर्षानुवर्षे पक्षासाठी धावलं झेंडं फडकवलं प्रचार केला.आता घराणेशाही नको खऱ्या कार्यकर्त्या महिलेलाच संधी मिळाली पाहिजे त्यांचा हा अट्टाहास पाहता पक्षांमध्येही घरातील विरुद्ध खऱ्या कार्यकर्त्या अशी शाब्दिक झुंज सुरू झाली आहे.दरम्यान पक्षांतर्गत समीकरणं आणि वरदहस्ताचे हिशोब चालूच आहेत.काही नेते वरिष्ठांकडे चकरा मारतात तर काहींच्या गाड्या दिवसरात्र ठरावीक बंगल्याबाहेर उभ्या असतात.शहरात लोक हसत म्हणतात निवडणुकीच्या या काळात पेट्रोलचा खर्चही वाढलाय पण प्रचारासाठी नाही सेटिंगसाठी शेवटी सर्वांचं लक्ष आता एका प्रश्नावर खिळलं आहे नगराध्यक्ष पदाची खुर्ची कोणाच्या वाट्याला येणार? नेत्यांच्या अर्धांगिनी की निष्ठावंत महिला कार्यकर्त्या? सध्या तरी नांदगाव खंडेश्वरमध्ये पती प्रचारात पत्नी स्पर्धेत जनता तमाशात ! असं वातावरण रंगलेलं सध्या दिसत आहे.
