
प्रा.राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालयात दिक्षारंभ कार्यक्रम संपन्न
नांदगाव खंडेश्वर / तालुका प्रतिनिधी
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित प्रा.राजाभाऊ देशमुख कला महाविद्यालयामध्ये दीक्षारंभ कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. नवनियुक्त प्राचार्य डॉ. श्रीकांत दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या दृष्टीने पदवीधर विद्यार्थ्यांची भूमिका आणि शिक्षकांचे कर्तव्य या दृष्टीने दीक्षारंभ कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.
प्रारंभी संत गाडगेबाबा प्रतिमा पूजनानंतर कार्यक्रमाची रूपरेषा प्रा. डॉ. विवेक चौधरी यांनी प्रास्ताविक पर भाषणातून मांडली. प्रा. डॉ. गौतम सातदिवे यांनी विविध शिष्यवृत्ती योजना व त्याची कार्यवाही यावर मार्गदर्शन केले. प्रा. डॉ निलेश गोरे यांनी ग्रंथालयातील विविध सुविधा, करिअर कट्टा आणि विद्यार्थी ग्राहक भंडार या संबंधी माहिती विद्यार्थ्यांना दिली. राष्ट्रीय सेवा योजना तसेच समान संधी केंद्र व इतर उपक्रमा संबंधी माहिती प्रा. डॉ. राजेश मेश्राम यांनी दिली. प्रा. डॉ. प्यारेलाल सूर्यवंशी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचे गुणधर्म मेजर-मायनर विषयी निवड, चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम, अभ्यासक्रम तसेच परीक्षा पद्धती विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. श्रीकांत दांडगे यांनी अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी महाविद्यालयातील नियमित उपस्थिती, शिस्त आणि शिक्षकांशी संवाद यावर प्रकाश टाकला. शिक्षक व विद्यार्थ्यांमधील सुसंवाद व समन्वयातून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावी पद्धतीने राबविण्यासोबत विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची ग्वाही प्राचार्य डॉ. दांडगे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून दिली.दीक्षारंभ कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध विभाग सुविधा तसेच उपक्रमाची पाहणी केली. शिष्यवृत्ती अर्ज, परीक्षा फॉर्म,ग्रंथालय कार्ड, ओळखपत्र व महाविद्यालय गणवेश वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ चौधरी, डॉ. सातदिवे, प्रा.डॉ. गोरे,शाम ठाकरे,कु. ऋतुजा जाधव यांनी परिश्रम घेतले.