प्रशासन-जनतेतील दुवा अधिक मजबूत
विविध विभागांचे अधिकारी एकत्रित उपस्थित
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून बुधवार,दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी तालुका प्रशासन नांदगाव खंडेश्वर यांच्यावतीने जनसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी अमरावती तथा समन्वय अधिकारी श्री. अनिल भटकर उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद अमरावतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा समन्वयक अधिकारी श्री. विलास मरसाळे, तहसीलदार तथा सचिव जलसंवाद व तक्रार निवारण कार्यक्रम श्रीमती अश्विनी जाधव, नगराध्यक्ष सौ. प्राप्ती विलास मारोटकर, गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, भूमी अभिलेख कार्यालयाचे श्री. नागरगोजे, नायब तहसीलदार श्री. सुनील राठोड, श्री. सदानंद देशपांडे, श्री. मुजमुले तसेच निरीक्षण अधिकारी श्रीमती एस. पी. राठोड यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विजय दामोदर पेढेकर यांनी केले, तर प्रास्ताविक श्री. देशपांडे (नायब तहसीलदार) यांनी केले. तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमधून मोठ्या संख्येने शेतकरी व नागरिक उपस्थित राहून त्यांनी आपल्या लेखी तक्रारी व समस्या थेट प्रशासनाकडे मांडल्या.

शेतकरी व नागरिकांच्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही
या कार्यक्रमामध्ये शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्यक्ष लेखी तक्रारी स्वीकारून त्या पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांकडे पाठविण्यात आल्या. प्रशासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून हा कार्यक्रम प्रभावी ठरत असून समस्यांचे त्वरित व एकत्रित निराकरण करण्याचा मुख्य शासकीय उद्देश यामधून साध्य होताना दिसून येत आहे.मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला गती देत जिल्हा परिषद व तालुकास्तरीय सर्व विभागांचे अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तसेच संपूर्ण लिपिक संवर्ग व महसूल सेवक या कार्यक्रमास उपस्थित होते. प्रशासनातील शेवटच्या घटकापासून ते वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनी एकाच ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची प्रक्रिया राबवली.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन निरीक्षण अधिकारी श्रीमती एस. पी. राठोड यांनी केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
