अचलपुर / परतवाडा (प्रतिनिधी)
ग्राहकांमध्ये नियमित वीज देयक भरणा, घराच्या छतावर सौर संच (रूफटॉप सोलर) स्थापना करून वीज बिल कमी करणे, दिवसा वीज वापरासाठी मिळणारी सवलत, स्मार्ट मीटरचे फायदे, वीज चोरी प्रतिबंध व सुरक्षित वीज वापर याबाबत जनजागृती करण्यासाठी महावितरण अचलपुर विभागाच्या वतीने परतवाडा–अचलपुर या जुळ्या शहरांत भव्य पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले.शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीदरम्यान संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. महावितरणचे तांत्रिक, मानव संसाधन, लेखा, देयक व महसूल विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांनी गणवेश परिधान करून अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने, वाहतुकीस कोणताही अडथळा न आणता रॅली मार्गक्रमण केल्याने नागरिकांचे लक्ष वेधले गेले.

शहरातील विविध चौकांत थांबून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना महावितरणच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. विशेष म्हणजे या रॅलीत महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. एकूण 380 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला.सदर रॅलीचे आयोजन अशोक साळुंके, मुख्य अभियंता, अमरावती परिमंडळ यांच्या संकल्पनेतून करण्यात आले. दीपक देवहाते, अधीक्षक अभियंता, अमरावती मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप अंधारे, कार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालय अचलपुर यांच्या नेतृत्वात रॅली यशस्वीरीत्या पार पडली.

रॅलीत प्रशांत फुटाणे, उमेश राठोड, नीलेश बोरीकर, संजय दातीर, नीलिमा गावंडे, राजेश तिवारी, विशाल पसारकर, वंदना भलावी यांच्यासह बहुसंख्य अभियंते, अधिकारी, कर्मचारी, उपकेंद्र सहाय्यक व तांत्रिक कर्मचारी सहभागी झाले होते.
