प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांचा सेवागौरव सोहळा संपन्न
चांदुर रेल्वे /तालुका प्रतिनिधी
विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित महिला कला – वाणिज्य महाविद्यालयाच्यावतीने राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने त्यांचा सेवागौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. तुषार देशमुख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ साहित्यीक डॉ. अशोक पळवेकर, माजी माहिती व तंत्र अधिकारी मा. सुधाकरराव तलवारे, इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालय, अमरावतीचे प्राचार्य डॉ. अजय कोल्हे, डॉ. सीमा जगताप, सं. गा. बा. अमरावती विद्यापीठाचे अधिसभा सदस्य डॉ. विजय कापसे, सौ. किरण प्रदीप दंदे हे उपस्थित होते.या सेवागौरव सोहळ्याची सुरुवात संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. प्रास्ताविकाद्वारे इंग्रजी विभागप्रमुख डॉ. सीमा जगताप यांनी डॉ. प्रदीप दंदे यांच्या महाविद्यालयीन कारकीर्दीवर प्रकाशझोत टाकला. यानंतर डॉ. विजय कापसे यांनी डॉ. दंदे यांच्या मैत्रीपूर्ण जीवनातील आठवणींना उजाळा दिला. जेष्ठ आंबेडकरी विचारवंत व साहित्यिक डॉ. अशोक पळवेकर यांनी प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांच्या शैक्षणिक, राजकीय व सामाजिक वाटचालीत ते कसे आदर्श जीवन जगत आले आणि शैक्षणिक सेवेची तीस वर्षे अतिशय स्वच्छ व प्रामाणिकपणे पार पाडली या बद्दल मार्मिक विचार मांडले. आंबेडकरी चळवळीतील ‘पँथर’ कर्तव्यदक्ष कार्यकर्ता ते आदर्श शिक्षक असा जीवनप्रवास मा. सुधाकर तलवारे यांनी मांडला. इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय कोल्हे यांनी डॉ. दंदे यांना भावी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांनी डॉ. श्री व सौ. दंदे यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना डॉ. प्रदीप दंदे भावूक झाले. महाविद्यालयात सेवा देत असताना केलेल्या शैक्षणिक व सामाजिक संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत विदर्भ युथ वेलफेअर सोयायटीचे संस्थापकीय अध्यक्ष स्व. प्रा. राम मेघे (बाबूजी) यांनी शैक्षणिक सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मनस्वी आभार व्यक्त केले. तसेच कौटुंबिक सदस्य, महाविद्यालयातील मित्रपरिवार यांचे सुद्धा मनोमन आभार व्यक्त केले. यावेळी केलेल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. तुषार देशमुख यांनी प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून त्यांचा सहवास आणखी काही काळ लाभावयास पाहिजे होता. त्यांच्या हरहुन्नरी व्यक्तिमत्त्वातून बऱ्याच गोष्टी नव्याने शिकायला व अनुभवायला मिळाल्या असत्या असे मत व्यक्त करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अतुल वानखडे यांनी तर आभारप्रदर्शन कु. निकिता सुलताने हिने केले.विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीनजी धांडे, उपाध्यक्ष ऍड. उदयजी देशमुख, कोषाध्यक्ष डॉ. हेमंतजी देशमुख, सचिव श्री. युवराजसिंग चौधरी, सदस्य श्री. नितीनजी हिवसे, डॉ.सौ. पूनम चौधरी, श्री. पंकज देशमुख, प्रा. विनय गोहाड, प्रा. गजानन काळे यांनी प्रा. डॉ. प्रदीप दंदे यांना निवृत्तीनंतरच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला प्रा. संजीव भुयार, प्रा. अनिता धुर्वे, प्रा. दीपक सुखदेवे, प्रा. नितीन भालेराव, प्रा. मृणाली वानखडे, प्रा. नीलिमा टिचुकले, प्रा. पूजा देशमुख, श्री. प्रशांत देशमुख, श्री. सदांशीवे, नितीन अंभोरे, अनिल शास्त्रकार, रजनी वघवे, रेखा मेश्राम व मोठ्या संख्येने विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
