
स्थानिक गुन्हे शाखेची अमरावती ग्रामीणमध्ये यशस्वी कारवाई
अमरावती /जिल्हा प्रतिनिधी
अमरावती जिल्ह्यातील शिरजगाव कसबा पोलिस ठाणे हद्दीतील ब्राम्हणवाडा ते शिरजगाव रोडवरील बगाडी नाल्यात एका अज्ञात महिलेचे अर्धवट कुजलेले प्रेत आढळल्याने खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती ग्रामीणच्या पथकाने अवघ्या काही तासांत जेरबंद केले. आरोपीचे नाव अनिल झनकराम जांभेकर (वय ३५, रा. गळंकी, ता. अचलपूर) असे असून त्याने प्रेमसंबंधातून पैशाच्या वादातून महिलेचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आहे.दिनांक १० जुलै २०२५ रोजी पोलिस स्टेशन शिरजगाव कसबा हद्दीत ब्राम्हणवाडा ते शिरजगाव रोडवरील नाल्यात एका अज्ञात महिलेचे प्रेत असल्याची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक पंकजकुमार कुमावत, सहायक पोलीस अधीक्षक शुभम कुमार, तसेच पोलीस निरीक्षक किरण वानखडे (स्थागुशा), सहा. पो.नि. महेंद्र गवई (ठाणेदार, शिरजगाव कसबा) यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला सुरुवात केली.प्रेताचे हातपाय बांधलेले, ब्लँकेटमध्ये गुंडाळलेले, तसेच हातावर “Anil” व “Durga” अशी नावे गोंदलेली असल्याने ही हत्या असून आरोपी मृतकेशी ओळखीचा असल्याची शक्यता निर्माण झाली.स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने प्रेताचे फोटो व माहिती विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर प्रसारित केल्यानंतर परतवाडा येथील एका युट्युब पत्रकाराच्या मदतीने मृत महिला दुर्गा विशाल श्रोती (वय २७, रा. गळंकी) असल्याचे निष्पन्न झाले. तिच्या भावाने फोटोवरून ओळख पटवली.
प्रेमसंबंधातून हत्या, आरोपीची कबुली
पोलिसांनी दुर्गाच्या ओळखीच्या संशयित अनिल जांभेकर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने विश्वासात घेतल्यावर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की, दुर्गा ही त्याच्याकडे पैशासाठी सतत मागणी करत होती. ५ जुलै रोजी झालेल्या वादात त्याने तिचा गळा आवळून खून केला. नंतर हातपाय बांधून ब्लँकेटमध्ये गुंडाळून मोटारसायकलवरून नाल्यात फेकून दिले.शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. २६९/२५, भादंवि कलम १०३(१), २३८(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला पोलिस कोठडीत देण्यात आले आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक पंकजकुमार कुमावत, सहायक पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. पथकात सहा. पो.नि. सचिन पवार, अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सचिन मिश्रा, शकिल चव्हाण, सागर नाठे, शांताराम सोनोने, सायबर सेलचे सागर धापड व चालक निलेश आवडकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.