डिगरगव्हाण तलावातील घटना
नागरिकांत संताप, माहुली जहागीर पोलिसांत गुन्हा दाखल
नांदगाव पेठ / मंगेश तायडे
नजीकच्या डिगरगव्हाण येथील एका पोल्ट्रीफार्म संचालकांने फार्म मधील मृत झालेल्या शेकडो कोंबड्या गावातील तलावात फेकून दिल्याने नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. कुजलेल्या कोबड्यांच्या प्रचंड दुर्गंधीनंतर हा प्रकार उघडकीस आला असून डिगरगव्हाण येथील कर्तव्यदक्ष सरपंचा जिल्लेश्वरी शंकरराव ठाकरे यांच्या तक्रारीनंतर माहुली जहागीर पोलिसांनी त्या पोल्ट्रीफार्म संचालकावर गुन्हे दाखल केले.या प्रकारामुळे गावकऱ्यांच्या जीवितासमोर मोठा धोका उभा राहिला असून, परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.डिगरगव्हाण येथील सरपंचा जिलेश्वरी ठाकरे यांनी माहुली पोलीस ठाण्यात यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीनुसार आरोपी पांडुरंग माणिकराव कडू (वय ५८, रा. डिगरगव्हाण) यांचे डिगरगव्हाण येथे पोल्ट्रीफार्म असून १९ सप्टेंबर रोजी एका अज्ञात रोगामुळे त्यांच्या फार्म मधील शेकडो कोंबड्या अचानक मृत पावल्या.पोल्ट्रीफार्मचे संचालक पांडुरंग कडू यांनी कसलाही विचार न करता २० सप्टेंबरच्या मध्यरात्री सर्व मृत कोंबड्या थेट गावातील तलावात टाकल्या. या कोंबड्या कुजलेल्या अवस्थेत असल्याने तलावातील पाणी दूषित झाले.

या तलावाशेजारील विहिरीतून गावाला पाणीपुरवठा केला जात असल्याने हे दूषित पाणी थेट घराघरात पोहोचण्याचा धोका निर्माण झाला.प्रचंड दुर्गंधी वाढल्यामुळे नागरिकांनी दोन दिवसांपूर्वी त्याठिकाणी जाऊन बघितले तर तलावात असंख्य मृत कोंबड्या कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्या. नागरिकांनी ही बाब सरपंच ठाकरे यांच्या लक्षात आणून दिली. सरपंच ठाकरे यांनी तातडीने तलावाची पाहणी करून माहुली जहागीर पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. सरपंच जिल्लेश्वरी ठाकरे यांच्या तक्रारीनुसार माहुली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध बिएनएस च्या कलम २७९,२८०,२७२,१२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे
पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक
पाण्याच्या नैसर्गिक स्त्रोतांमध्ये अशा प्रकारे कुजलेले प्राणी टाकणे हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत गंभीर गुन्हा आहे. तलावातील पाण्यामुळे जमिनीतही दूषितपणा पसरण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जर हे दूषित पाणी गावकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यात मिसळले असते, तर अनेक नागरिक थेट मृत्यूच्या विळख्यात सापडले असते, अशी भीती व्यक्त होत आहे.यावेळी पंचनामा करण्यासाठी जलसंधारण विभाग, आरोग्य विभाग , तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी आदींची उपस्थिती होती.
पोल्ट्रीफार्मची ना हरकत रद्द करा-डॉ. शंकर ठाकरे
गावाच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या निर्लज्ज कृत्यामुळे गावात प्रचंड खळबळ उडाली असून, संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करावी तसेच त्या पोल्ट्री फार्मची ना हरकत रद्द करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. शंकर ठाकरे यांनी केली आहे.
