
कुटुंबावर दुःखाचा डोंगर आर्थिक मदतीची मागणी
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपरी गावंडा येथील शेतकरी गजानन पांडुरंग राऊत (वय ५० वर्ष) यांचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना १७ जुलै २०२५ रोजी घडली.गजानन राऊत हे आपल्या शेतात सोयाबीन पिकावर कीटकनाशक फवारणी करण्यासाठी गेले असता त्यांनी फवारणीसाठी शेतातील एका पेटीमध्ये हात घातला.दुर्दैवाने त्या पेटीत साप लपलेला असल्याने त्याने राऊत यांच्या हाताला चावा घेतला.सर्पदंशानंतर त्वरित उपचार न मिळाल्याने आणि जवळपास दोन तास विलंब झाल्याने त्यांची प्रकृती खालावली.त्यानंतर त्यांना तातडीने इर्विन रुग्णालय अमरावती येथे उपचारार्थ नेण्यात आले.मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.१८ जुलै रोजी त्यांचे शवविच्छेदन झाल्यानंतर पिंपरी गावंडा येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. त्यांच्या जाण्याने राऊत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील,एक मुलगा,एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे.गजानन राऊत यांच्याकडे पाच एकर शेती असून कुटुंबाचा प्रमुख आधारच हरपल्याने आता त्यांच्या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले आहे.गावकऱ्यांनी गजानन राऊत यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी एकमुखी मागणी केली आहे. पिंपरी गावात शोककळा पसरली असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.