ग्रा.पं.सदस्य संदेश ढोके यांची गटविकास अधिकारी यांच्याकडे मागणी
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
ग्रामपंचायत ही गावच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे.असे असताना गावचा विकास करणे ही ग्रामसेवकाची जबाबदारी आहे.तसेच गावात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सुद्धा ग्रामसेवकाची आहे.शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीच्या पैशांचा हिशोब ठेवण्या बरोबरच जमा खर्चाचा ताळमेळ व कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याची जबाबदारी ही ग्रामसेवकावर असते.मात्र नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी ग्रामपंचायत येथील सचिव विशाल मनोहरे आपली जबाबदारी पार पाडत नसल्याची तक्रार पिंपळगाव निपाणी येथील ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी नांदगाव खंडेश्वर गटविकास अधिकारी यांच्या कडे केली.

सविस्तर वृत्त असे की, ग्रामपंचायत कार्यालय पिंपळगाव निपाणी येथील सचिव विशाल मनोहरे यांना विविध कामा संबंधित ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी माहिती मागितली व सचिव विशाल मनोहरे हे माहिती देत नसून, उडवाउडवीचे उत्तर देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करतात.अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे दिली.व संदेश ढोके यांनी म्हटले की,मी ग्रा.प. सदस्य या नात्याने माझ्या वार्डचा तथा गावाचा प्रतिनिधी असल्याने माझ्या वार्डातील व गावातील विकास कामाची माहिती असणे गरजेचे आहे. झालेली कामे, प्रस्तावित असलेली कामे व नव्याने मंजुरी करिता देणे असलेली कामे याबाबत मी गाव प्रतिनिधी म्हणून मला जागरूक रहावे लागते.पंरतु ग्रामसचिव विशाल मनोहरे यांना ग्रामपंचायत कामा संबंधीत माहिती मागितली असता ते माहिती देण्यास असमर्थता दर्शवतात तसेच माहिती विचारली असता, उडवा उडवीचे उत्तर देऊन माहिती देण्यास टाळाटाळ करतात.मी माहिती अधिकारात सुद्धा माहिती मागितली असता विहित मुदतीच्या आत माहिती उपलब्ध करून दिल्या जात नाही. तसेच शासकीय कामाची सुद्धा माहिती वेळेवर देत नाही.गावच्या विकासासाठी किती निधी खर्च केला? कुठे खर्च केला? असे अनेक प्रकारची माहिती विचारली असता, त्यांनी मला माहिती दिली नाही. वार्ड व गाव प्रतिनिधी बाबत जर ग्रामसेवकांची उदासीनतेची भूमिका असेल तर त्यांच्या कार्यप्रणाली वर शंका येत असून सचिव विशाल मनोहरे यांच्या कार्यकाळातील सर्व कामाची चौकशी करून ग्रा. प. सदस्याला माहिती न देण्याच्या व माहिती लपवित असल्याच्या कारणास्तव व बेजबाबदार पणे काम करणाऱ्या सचिवाला समज देऊन आपल्या स्तरावर उचित कार्यवाही करण्याची मागणी ग्रामपंचायत सदस्य संदेश ढोके यांनी गटविकास अधिकारी यांच्या कडे केली.
