
शेतकरी आधुनिक यंत्रसामग्रीकडे वळले
मंगरूळ चव्हाळा /अनिकेत शिरभाते
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मागील एक आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या कामाला गती दिली आहे. निंदन,खुरपणी,आणि डवरणी यांसारखी शेतीची पारंपरिक कामे सध्या वेगाने सुरू असून कामासाठी शेतकऱ्यांमध्ये गडबड पाहायला मिळत आहे.पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी डवरणीला सुरुवात केली आहे. मात्र बैलजोडींची संख्या कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना डवरणी करणे कठीण झाले आहे.बैलजोडी भाड्याने मिळत नसल्यामुळे काही शेतकरी छोट्या ट्रॅक्टरचा वापर करून डवरणी करत आहेत. यामुळे पिकाचे थोडे नुकसान होत असले तरी वेळ वाचवण्यासाठी शेतकरी या पर्यायाकडे वळले आहेत. पारंपरिक शेतीच्या तुलनेत आधुनिक साधनांचा वापर अपरिहार्य झाला आहे, हे शेतकऱ्यांना आता लक्षात आले आहे.
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील लालसर मुरमाड जमिनीला आता पाण्याची नितांत आवश्यकता आहे.अशा परिस्थितीत पाऊस लवकर सुरू व्हावा यासाठी शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसले आहेत. यावर्षी सोयाबीन,तूर आणि कपाशीच्या पेरण्या चांगल्या प्रकारे पार पडल्या आहेत पीक सध्या चांगल्या स्थितीत आहे. पिकांची वाढ समाधानकारक असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे आणि शेतीच्या कामाला चांगला वेग आला आहे.
पावसाने लवकरच पुनरागमन करावे अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत, जेणेकरून पीक उत्पादनात अडथळा निर्माण होणार नाही आणि शेतीच्या पुढील टप्प्यातील कामे सुद्धा वेळेवर पूर्ण होतील.
👍