
उपलब्धता तपासून तत्काळ कार्यवाहिचे निर्देश
अमरावती / जिल्हा प्रतिनिधी
शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी महावितरणने पाऊल उचलले असून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्याची उपलब्धता आणि तांत्रिक बाबी शक्य असल्यास त्या भागातील शेतकऱ्यांना तत्काळ दिवसा आठ तासाकरीता वीज पुरवठा सुरू करावा,तसेच दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी तांत्रिक फिजिबिलीटी नसेल तर आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांचा प्रस्ताव परिमंडळ कार्यालयाला पाठवावा असे निर्देश मुख्य अभियंता अमरावती परिमंडळ अशोक साळुंके यांनी दिले आहे.शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा शासनाचा मानस असून त्यादृष्टीने राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या अत्यंत महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत. संप्टेबर २०२६ मध्ये पूर्ण होणाऱ्या मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यात १६ हजार आणि परिमंडळात ७८३ मेगावॅट वीज विकेंद्रीत स्वरूपाचे सौर प्रकल्प उभारून निर्मिती करण्यात येणार आहे. असे असले तरी परिमंडळातील १८८ पैकी फक्त ९ सौर प्रकल्प पूर्ण होवून सुरू झाले आहे. परंतू तरीही परिमंडळातील शेतीला दिवसा आठ तास वीजेची उपलब्धता आणि तांत्रिक फिजिबीलीटी पूर्ण करणाऱ्या त्या सर्वच शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्देश महावितरणच्या मुख्य कार्यालयाने दिले दिले आहेत.शेतीला दिवसा वीज देण्यासाठी आवश्यक तांत्रिक बाबी आणि उपकेंद्राचे सक्षमिकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेशी जोडण्यात आलेल्या ३३ केव्ही उपकेंद्राची देखभाल दुरूस्ती करून उपकेंद्राचे सक्षमीकरण करण्यात आले आहेत. आवश्यक त्या ठिकाणी ६ पॉवर ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेतही वाढ करण्यात आली असून ५ उपकेंद्रात नविन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहे. त्याचबरोबर आरडीएसएस योजनेत परिमंडळात गावठान आणि कृषी फिडर वेगळे करून परिमंडळात २०५ नविन फिडर टाकण्याचे काम सुरू असून ४८ फिडरचे काम पूर्ण झाले आहे.याचबरोबर पुसद विभागात पेढी आणि जाम बाजार येथे नविन ३३ केव्ही चे उपकेंद्र उभारण्यात येत आहेत.