
पारधी समाजाच्या 30 निवडक प्रकरणांची ऐतिहासिक सुनावणी 25-26 जूनला रविभवन.
नागपूर / जिल्हा प्रतिनिधी
नागपूर येथे दिनांक 14 एप्रिल रोजी रविभवन, नागपूर येथे झालेल्या पारधी न्याय संकल्प परिषदेत 118 प्रकरणांपैकी 30 निवडक प्रकरणांची ऐतिहासिक सुनावणी उद्या 25 आणि 26 जून 2025 रोजी रविभवन येथे होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड. धर्मपाल मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह, उपायुक्त डीगाबर चव्हाण आणि पारधी समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते..आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी सांगितले की, पारधी समाजाच्या विविध समस्यांवर होणाऱ्या या सुनावणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान संबंधित अधिकारी उपस्थित न राहिल्यास त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा आयोगाने दिला आहे.पारधी समाजावर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी अनुसूचित जाती-जमाती आयोग आणि आदिवासी विकास विभागाने पुढाकार घेतला आहे.
“आता पारधी समाजावर होणारे अन्याय सहन केले जाणार नाही. अत्याचार करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई केली जाईल,” असे आयोगाने पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.राज्यभरातून निवडलेल्या 30 प्रकरणांच्या सुनावणीसाठी युवा एकीकरण सामाजिक समाज संघटनेचे (अध्यक्ष) तथा अखिल भारतीय आदिवासी विकास विद्यार्थी परिषदेचे (अमरावती जिल्हाध्यक्ष) मा. उमेश पवार तसेच पदाधिकारी शारदेश पवार, शांतेश भोसले, गजानन भोसले, अनेश पवार , प्रवीण पवार यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ऍड धर्मपाल मेश्राम आणि आदिवासी विकास विभागाचे आयुक्त लीना बनसोड, नागपूर अपर आयुक्त आयुषी सिंह, उपायुक्त दिगंबर चव्हाण यांचे आभार मानले.पारधी समाजाच्या न्यायासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.