
अमरावती / उत्तम ब्राम्हणवाडे
जिल्ह्यातील तरुणांना रोजगाराची दिशा देणारा ‘पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा’ नुकताच श्री गुरुदेव सेवाश्रम गुरुकुंज मोझरी,ता.तिवसा येथे यथे आयोजित करण्यात आला होता. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच मॉडेल करिअर सेंटर आणि डाखरे महाराज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या मेळाव्याने अनेक तरुणांना त्यांच्या करिअरसाठी संधी उपलब्ध करून दिली.
या मेळाव्याचेउद्घाटन गुरुदेव नगरचे उपसरपंच मिलिंद काळमेघ यांच्या हस्ते झाले.यावेळी गुरुदेव मानव विकास संस्थेचे अमोल बांबल, गुरुकुल मोझरीचे संचालक रवी मानय ,डाखरे महाराज फाउंडेशनचे संचालक धनंजय डाखरे उपस्थित होते.उद्योग,उत्पादन,आयटी,विक्री,मार्केटिंग आणि इतर क्षेत्रांतील प्रतिनिधींनी थेट 202 उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.यापैकी 79 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली,तर 11 उमेदवारांची अंतिम निवड जागेवरच करण्यात आली. या मेळाव्याची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे 2 हजार उमेदवारांचा सहभाग, 40 प्रमुख कंपन्यांचा सहभाग,75 पेक्षा अधिक नोकरीच्या संधी आणि 10 वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी हा मेळावा खुला होता. ‘गार्डियन्स ट्रेनिंग अकॅडमी, हैदराबाद‘,’टेक्नोक्राफ्ट प्रा. लि., नांदगाव पेठ, अमरावती”स्पिनी व्हॅल्युड्राइव्ह टेक्नॉलॉजी प्रा. लि., गुरुग्राम’,’फातेमा कॉलेज ऑफ नर्सिंग,तिवसा, अमरावती’ या नामवंत कंपन्यांनी विविध पदांसाठी मुलाखती घेतल्या.काही उमेदवारांची लगेच निवड झाली,तर काहींची प्राथमिक निवड करण्यात आली.रोजगार मेळाव्यामुळे जिल्ह्यातील तरुणांना प्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून, भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात अशा उपक्रमांचे आयोजन करून तरुणाईच्या स्वप्नांना दिशा देण्याचा निर्धार आयोजकांनी व्यक्त केला आहे. मेळाव्याचे संचालन राजूभाऊ हरणे यांनी, तर आभार धनंजय डाखरे यांनी मानले.