
हजारो भाविकांना महाप्रसादाचा लाभ
माहूर / संजय घोगरे
नारळी पौर्णिमा निमित्त पंचक्रोशी परिक्रमा यात्रेच्या दुसऱ्या दिवशी माहूर नगरीत भक्तिभावाचा आणि सेवा भावाचा संगम अनुभवायला मिळाला. नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांच्या पुढाकारातून दत्त चौक टी-पॉईंट जवळ तब्बल पाच क्विंटल मसालेभाताचा महाप्रसाद वाटप करण्यात आला.‘अन्नदान हेच श्रेष्ठ दान’ या उदात्त विचाराला साजेसा हा उपक्रम असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. तब्बल अडीच क्विंटल तांदूळ व निवडक मसाले वापरून तयार केलेल्या खिचडीचा आस्वाद पंचक्रोशी प्रदक्षिणेतील हजारो भाविकांनी घेतला. 26 किमीची प्रदक्षिणा पूर्ण करून थकलेल्या यात्रेकरूंनी महाप्रसादाचा मनसोक्त आनंद लुटला. दोन ते तीन तासांत संपूर्ण महाप्रसाद वाटप पूर्ण झाल्याचे यावेळी दिसून आले.भाविकांच्या सेवेसाठी नगराध्यक्ष दोसानी नेहमीच यात्रोत्सव, धार्मिक वा सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी होत असतात. या प्रसंगी उपनगराध्यक्ष नाना लाड, अमित येवतीकर, मेघराज जाधव, नगरसेवक प्रतिनिधी रफीक सौदागर, आकाश कांबळे, राज ठाकूर, जगदीश वडसकर, विजय शिंदे, गणेश जाधव, जावेद दोसानी, सैफ दोसानी, संदीप गज्जलवाड, देविदास जोंधळे, विशाल मारेवाड, पत्रकार अनिल मंडपेलीवर, अडकीने भाऊ, गणेश खडसे, रफिक भाई गाईड, सदानंद पुरी आदी मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, यात्रेतील भाविकांना कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी नगराध्यक्ष फिरोज दोसानी व उपनगराध्यक्ष नाना लाड यांनी पहाटे साडेचार वाजेपर्यंत प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने देखरेख ठेवली. स्थानिक नागरिक आणि भाविकांकडून या उपक्रमाचे मोठे कौतुक करण्यात आले.तर अष्टगंध गणेश मंडळाच्या वतीने वसंतराव नाईक चौक येथे दीड क्विंटल मसाले खिचडीचा महाप्रसाद आयोजन करण्यात आलं होतं.