माहूर/ संजय घोगरे
अश्विन शुद्ध पक्ष चतुर्थी, नवरात्रातील चौथी माळ साजरी करताना माहूर गडावर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली. घटास माळ अर्पण करून नवरात्र उत्सवाची विधिवत सुरुवात झाली असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने निनादला.रिमझिम पावसातही भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. वरून राजाची कृपादृष्टी असल्यासारखे वातावरण असून, पावसामुळे प्रशासनाला थोडीशी तारांबळ होत असली तरी भाविकांच्या भक्तीभावात मात्र कोणतीही खंड पडलेली दिसली नाही.

श्री रेणुका देवी संस्थान येथे मुख्य पुजारी शुभम भोपी यांनी नित्यनियमाप्रमाणे पूजा केली तसेच कुमारी पूजन करून मंदिर परिसरात छबिना काढण्यात आला. याशिवाय माहूर येथील महिला मंडळाने श्री रेणुका मातेस कुमकुमाचरण अर्पण केले.भाविकांसाठी विविध ठिकाणी अन्नछत्राची व्यवस्था करण्यात आली असून, सर्वांनी या महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्नदात्यांकडून करण्यात आले आहे.दरम्यान, दोन वर्षांपासून सुरू असलेले स्कायवॉकचे काम अद्याप अपूर्ण असल्याने भाविकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. तरीसुद्धा भक्तगणांच्या उत्साहात मात्र किंचितही कमी दिसून आली नाही.
