Wireless earphone in the girl's ear.
तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये तरुणांचे प्रमाण जास्त
नांदगाव खंडेश्वर/उत्तम ब्राम्हणवाडे
तरुणांमध्ये सध्या हेडफोन, एअरफोन आणि ब्ल्यूटूथचा वापर वाढला आहे. तासनतास मोठ्या आवाजात गाणी लावून ऐकत बसणे, मोबाईलवर चित्रपट, वेबसिरीज किंवा एखादा व्हिडिओ पाहताना हेडफोन लावणे, त्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त आवाज ठेवणे यामुळे कानांचे विकार वाढत असल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदविले आहे.शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांकडे त्याबाबतच्या तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या सध्या वाढली आहे. त्यामध्ये विशेषतः तरुणांचे प्रमाण जास्त आहे. याबाबत वेळीच लक्ष न दिल्यास त्यांना बहिरेपणाची देखील समस्या उद्भवू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले.बस, रेल्वे, बाइकवरुन प्रवास करताना किंवा पायी चालताना हेडफोन किंवा ब्ल्यूटुथद्वारे गाणी ऐकणे, मोबाईलवर बोलण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, या गॅझेटचा अतिवापर कानाच्या दुखण्याबरोबरच रक्तदाब, नैराश्य, चिडचिडेपणा व मानसिक आजारांना निमंत्रण देत आहे.

जास्त आवाजामुळे होणारे परिणाम
■ ऐकायला कमी येणे
■ कानामध्ये आवाज येणे
चक्कर येणे
■ नैराश्य, चिडचिडेपणा वाढणे
■ दुर्लक्ष केल्यास कायमस्वरुपी बहिरेपणा
काय काळजी घ्याल ?
▶️ एअरफोन, हेडफोनचा वापर मर्यादित करा.
▶️एअरफोन वापरताना आवाज कमी ठेवा.
▶️कानाला लावून सतत मोबाईलवर बोलण्याऐवजी काही वेळा स्पीकरचा वापर करा.
आवाज हवा मर्यादेतच
७० डेसिबल किंवा त्यापेक्षा कमी आवाज सामान्यतः सुरक्षित मानले जातात. ८५ डेसिबल किंवा त्यापेक्षा जास्त आवाजाच्या पातळीच्या दीर्घकाळ संपर्कात राहणार्या व्यक्तींना श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका जास्त असतो.तरुणांनी हेडफोन, एअरफोन, ब्ल्यूटुथ यांचा एका मयदितच वापर करायला हवा. तसेच, या गॅझेटचा वापर करताना त्यांचा आवाज कमी ठेवावा. एअरफोनचा सतत मोठा आवाज ठेवल्यास ऐकायला कमी येणे आणि वेळप्रसंगी बहिरेपणा देखील येऊ शकतो. अशा परिस्थितीत कानाचे मशीन वापरावे लागते. अथवा, शस्त्रक्रिया करावी लागते. असे शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले आहे.
