
जयश्रीताईंनी दिला एक मानवतेचा अनोखा संदेश
ठाणे / विशेष प्रतिनिधी
समाजात वेगळेपणाने व माणुसकीने काहीतरी दिलं पाहिजे, हा संदेश ठाण्यातील एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाने पुन्हा अधोरेखित केला. डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड संस्थेच्या वतीने संस्थेच्या आधारस्तंभ आयुष्यमती जयश्री अनिलकुमार गायकवाड यांचा वाढदिवस अत्यंत भावनिक आणि प्रेरणादायी वातावरणात अनाथ व अंध विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात एमएसआरडीसी चे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड, सुप्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक, लातूरचे माजी खासदार आणि सुप्रीम कोर्टातील वकील डॉ. सुनील बळीराम गायकवाड, तसेच पूज्यनीय भिक्खू संघ यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना अभिनेत्री मानसी नाईक म्हणाल्या, “सेवा कुंड संस्थेचं काम अतिशय उल्लेखनीय आहे. जयश्रीताईंच्या वाढदिवसानिमित्त अंध व अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करून खरं तर पुण्याचं कार्य केलं आहे. समाजासाठी योगदान देणाऱ्या अशा संस्थेशी जोडले जावं हे माझं भाग्य आहे.”
डॉ. सुनील गायकवाड यांनी आपल्या भाषणात भावनाविवश होत म्हटलं, “सेवा कुंडच्या माध्यमातून आमच्या कुटुंबानं सामाजिक कार्याचा उच्च शिखर गाठला आहे. जयश्री वहिनी या आमच्या गायकवाड कुटुंबातील खऱ्या अर्थाने ‘आई’समान आहेत. दादा व अण्णा यांच्या नंतर कुटुंबाचा आधारस्तंभ म्हणून त्यांचं योगदान अमूल्य आहे. त्यांच्या वाढदिवसाला कोटी कोटी शुभेच्छा!”
या प्रसंगी बौद्ध संस्था यांच्या वतीने आयु. जयश्री गायकवाड यांना ‘माता रमाई आंबेडकर पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याचवेळी विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना ‘हिरकणी पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमात अंध व अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले, जे दृश्य उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारे ठरले.
कार्यक्रमात सेवा कुंडचे अध्यक्ष अश्वजित गायकवाड, उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे, सचिव अभिजीत गायकवाड, भाजप युवा नेते विश्वजीत गायकवाड, उद्योजक विजयकुमार गायकवाड, सरपंच राजेश सूर्यवंशी,रामलिंग पटसाळगे,यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा वाढदिवस केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर माणुसकीच्या मूल्यांचा, कुटुंबातल्या नात्यांचा आणि समाजप्रेमाचा सन्मान सोहळा ठरला. अशा कार्यक्रमातून समाजाला नवसंजीवनी मिळते, हेच या भावनिक सोहळ्याने सिद्ध केलं.
महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या विध्यार्थ्यांनी पहिल्यांदा मुंबई पाहिली होती. लिफ्ट मध्ये पहिल्यांदा वरच्या मजल्यावरून ये जा केली. गडकरी रंगायतन आणि तळ्यांचे शहर ठाणे बघितले. मुंबईचा समुद्र पाहिला. दिवाळी सारखी मजामस्ती स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. तो जयश्रीताई गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने…अंध मुलीने केक कापताना सादर केलेली कविता ऐकून उपस्थीतांच्या डोळ्यात पाणी आले. हा भूतो ना भविष्यती असा दिव्य सोहळा होता. यशस्वीतेसाठी अध्यक्ष अश्वजित गायकवाड, उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे, ट्रस्टी अतुल भोसले, संजय कर्णिक, महेंद्र दलालकर, महेश चव्हाण, अनिल सोनपाटकी, पुणे सेवाकुंडचे राजेश सूर्यवंशी यांनी अथक परिश्रम घेतले. विशेष म्हणजे जयश्रीताई यांच्या माता पित्यांचा सन्मान सेवाकुंड तर्फे अश्वजित गायकवाड, अभिजित गायकवाड, विश्वजित गायकवाड यांनी केला. हा भावनाविश सोहळा होता.