नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
शहरात सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने (MPCB) तातडीने चौकशी करून ‘अदानी गॅस लिमिटेड’ला आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.

नांदगाव खंडेश्वर शहरात सध्या विविध प्रभागांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, संबंधित कंत्राटदाराकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि धूळ साचली आहे. कंत्राटदाराने पाण्याचा फवारा मारणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. याचा सर्वाधिक फटका लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाच्या विकार असलेल्या रुग्णांना बसत असून शहरात डोळ्यांचे व घशाचे आजार वाढले आहेत.या गंभीर समस्येबाबत प्रभाग क्र. १४ च्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. “विकासकामासाठी रस्ते खोदणे आवश्यक असले तरी नागरिकांचे आरोग्य पणाला लावणे चुकीचे आहे. कंत्राटदाराने दिवसातून किमान ३ वेळा पाणी फवारावे आणि खोदलेली माती तात्काळ हटवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा त्यांनी दिला होता.

नगरसेविकांच्या या पाठपुराव्याला यश आले असून, महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. मंडळाच्या पथकाने नांदगाव खंडेश्वर येथे भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करावी आणि अदानी गॅस लिमिटेडला कामाच्या ठिकाणी धुळीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. या कार्यवाहीमुळे त्रस्त नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
