नगरसेविका प्रांजली गुल्हाने यांची मागणी
नांदगाव खंडेश्वर ( तालुका प्रतिनिधी )
नांदगाव खंडेश्वर नगर पंचायत कार्यक्षेत्रातील विविध समाज मंदिरे आणि सार्वजनिक सभागृहे कोणत्याही जाती-पातीचा भेदभाव न ठेवता सर्वधर्मीय जनतेसाठी नाममात्र शुल्कात उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी प्रभाग क्रमांक १४ च्या नगरसेविका सौ. प्रांजली राहुल गुल्हाने यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.या संदर्भात दिलेल्या निवेदनात प्रांजली गुल्हाने यांनी नमूद केले की, शहरातील समाज मंदिरे व सभागृहे ही शासकीय निधीतून लोककल्याणासाठी उभारण्यात आली आहेत. मात्र, सध्या अनेक कारणांमुळे किंवा जाचक अटींमुळे ही सभागृहे सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. खाजगी मंगल कार्यालयांचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असल्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना कौटुंबिक व सामाजिक कार्यक्रम साजरे करताना मोठा आर्थिक फटका बसतो.
नगरसेविका गुल्हाने यांनी पत्रात प्रामुख्याने खालील मागण्या केल्या आहेत:
१. नगर पंचायतीच्या मालकीची सर्व समाज मंदिरे सर्व समाजातील नागरिकांसाठी खुली करण्यात यावीत.
२. या वास्तूंच्या वापरासाठी केवळ नाममात्र मेंटेनन्स शुल्क (Maintenance Charges) आकारण्यात यावे.
३. सभागृहांच्या बुकिंगसाठी पारदर्शक आणि सुलभ प्रक्रिया राबवण्यात यावी.हा विषय जनहिताचा असल्याने आगामी सर्वसाधारण सभेच्या विषयसूचीमध्ये याचा समावेश करून तातडीने ठराव मंजूर करावा, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. या निर्णयामुळे शहरातील सामान्य जनतेला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, प्रशासनाच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
