नांदगाव खंडेश्वरात सरपंचांची ताकद एकवटली!
सरपंचांच्या विविध समस्येवर झाले विचार मंथन
नांदगाव खंडेश्वर /तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय प्रधान मुखीया सरपंच संघटनेच्यावतीने नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय विश्रामगृहात तालुकास्तरीय सरपंचांची बैठक मोठ्या उत्साहात पार पडली.या बैठकीत नांदगाव खंडेश्वर तालुक्याची नवी कार्यकारिणी सर्वानुमते जाहीर करण्यात आली.

यामध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील तरुण,तडफदार व गोर-गरीब जनतेसाठी सातत्याने झटणारे खेडपिंपरी येथील सरपंच मंगेश हंसराज कांबळे यांची तालुकाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे जिल्हा उपाध्यक्ष पदी मोरेश्वर दिवटे याची सर्वानुमते निवड करण्यात आली.तालुका उपाध्यक्षपदी धवलसरी येथील सरपंच मलिक अली,कार्याध्यक्षपदी पिंपरी निपाणी येथील सरपंच विशाल रीठे,सचिवपदी खिरसाना (निरसना) येथील सरपंच विशाल मेश्राम यांची तर कोषाध्यक्षपदी वेणी गणेशपूर येथील सरपंच सौ. मोनिका कराडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.या बैठकीचे अध्यक्षस्थान संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल उके व प्रदेशाध्यक्ष प्रमोद सांगोले यांनी भूषविले.बैठकीपूर्वी दोन्ही मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी ग्रामपंचायतींचे अधिकार, सरपंचांवर होणारा प्रशासकीय अन्याय, निधी वितरणातील अडचणी, विकास कामांतील विलंब यासह विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.या तालुकास्तरीय बैठकीस जावरा येथील सरपंच अमरीश काकडे, खंडाळा येथील सरपंच उमेश दहातोंडे,धानोरा फसी येथील ग्रामपंचायत सदस्य सुशील थोरात यांच्यासह तालुक्यातील असंख्य सरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.या नवनियुक्त कार्यकारिणीमुळे तालुक्यातील सरपंचांच्या हक्कांचा लढा अधिक तीव्र होणार असून ग्रामविकासाच्या आंदोलनाला नवी दिशा मिळणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.नवनियुक्त कार्यकारिणीचे उपस्थित सर्व सरपंच,उपसरपंच आणि सदस्यांनी सत्कार करून अभिनंदन केले.
