
लोडशेडिंगने जीवन अस्ताव्यस्त जबाबदारी कोणाची
येनस आणि नांदसावंगी सब स्टेशनचे काम केव्हा सुरू होणार
नांदगाव खंडेश्वर / उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील नागरिक सध्या गंभीर विजेच्या समस्येला तोंड देत आहेत. एकीकडे अविरत लोडशेडिंगने जीवन विस्कळीत झाले असून दुसरीकडे वीज बिल मात्र अव्वाच्या सव्वा आकारले जात आहे. या दुहेरी कोंडीतून नागरिक त्रस्त झाले असून, विद्युत विभागाच्या बेजबाबदार कारभाराबद्दल संताप व्यक्त करत आहेत.
लोडशेडिंगचा हैराण करणारा खेळ
तालुक्यात दररोज वेळी-अवेळी वीजपुरवठा खंडित होतो. अनेकदा दिवसा तर कधी रात्रीच्या वेळेसही वीज नसल्यानं घरगुती कामे,शेती पंप,लहान उद्योगधंदे आणि विद्यार्थ्यांचा अभ्यास यावर परिणाम होत आहे. विद्युत वितरण कंपनीने लोडशेडिंगचे कुठलेही वेळापत्रक जाहीर केलेले नसल्याने नागरिक संभ्रमात आहेत.
बिल वेळेवर, पण सेवा वेळेवर नाही
लोडशेडिंगमुळे लोकांचे हाल होत असताना, दुसरीकडे विद्युत विभाग मात्र कोणतीही तडजोड न करता वीज बिल वसुलीत गती दाखवत आहे. निर्धारित वेळेत बिल न भरल्यास तातडीने कनेक्शन कट करण्याची कारवाई केली जाते. मात्र, नागरिकांचे प्रश्न आणि त्रास यांकडे दुर्लक्ष केले जाते.
अधिकाऱ्यांची बेपर्वाई दररोज अपडाऊनचे नाटक
नांदगाव विद्युत विभागातील अधिकारी विशेषतः शहर अभियंता यांच्यावर नागरिकांनी बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. हे अधिकारी दररोज अमरावती वरून अपडाऊन करतात, मात्र तालुक्याच्या विजेच्या प्रश्नांबाबत कोणताही ठोस उपाय योजना करीत नाहीत. नागरिकांच्या तक्रारींना उत्तर देण्याचेही भान त्यांच्याकडे नाही.
महत्त्वाचे प्रकल्प अडकले – कोण जबाबदार ?
येणस व नांदसावंगी येथील मंजूर झालेल्या ३३ केव्ही सबस्टेशनच्या प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवातच करण्यात आलेली नाही. यासाठी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कोणताही पाठपुरावा केलेला नाही. या कामात देखील स्थानिक अधिकाऱ्यांची उदासीनता दिसून येते.
लोडशेडिंगचा त्रास होतोय त्याला जबाबदार कोण ?
विद्युत सेवा ही मूलभूत गरज असून, नागरिकांनी वेळेवर पैसे भरूनही योग्य सेवा न मिळाल्यास ती गंभीर प्रशासनिक अपयशाची बाब ठरते. आता तालुक्यातील जनतेने प्रश्न उपस्थित केला आहे.आमच्या त्रासाला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल विचारला जात आहे येथील वीज समस्या बाबत लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करावा आणि लोडशेडिंगचे ठोस वेळापत्रक जाहीर करावे त्याच प्रमाणे तालुक्यात मंजूर करण्यात आलेले येनस आणि नांदसावंगी
येथील ३३ केव्ही सबस्टेशनचे काम विनाविलंब सुरू करण्याबाबत पाठपुरावा करावा अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.
आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी.
विजेच्या बिघडलेल्या व्यवस्थेचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. अन्यथा हा प्रश्न केवळ अंधारातच नव्हे, तर प्रशासनातील अकार्यक्षमता उजेडात आणणारा ठरेल असे तालुक्यातील विज ग्राहकांचे म्हणणे आहे.त्याच प्रमाणे बेजबाबदार अधिकारी यांचेवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी केलेली आहे.