घशाचा संसर्ग; रुग्णालयात सर्दी-खोकल्याचे वाढले रुग्ण
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
बदलते हवामान, त्यातच तापाची साथ अशा वातावरणात डोक्याला ताप होईल,अशी अवस्था नांदगाव खंडेश्वर तालुका वासियांची झाली आहे. तापासह सर्दी-खोकला यासारख्या आजारांनी थैमान घातले आहे. विशेष करून लहान मुलांसह वयोवृद्धांमध्ये व्हायरल इन्फेक्शन झपाट्याने पसरसत असल्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गर्दी वाढली आहे. मागील काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागात पावसामुळे सर्दी, ताप, खोकला यासह विषाणूजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच आता जलजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. अतिसार, आमांश, कावीळ तसेच दूषित पाणी किंवा अन्नामुळे जलजन्य आजारांचा संसर्ग होऊन विषमज्वराचे रुग्ण आढळून येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण पर्यटनस्थळी फिरायला जातात. त्यामुळे बाहेरील पाणी किंवा अन्नाचे सेवन केले जाते. त्यामुळे जलजन्य आजारांचा धोका निर्माण होतो. त्यामुळे शुद्ध अन्नाचे सेवन करावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर जूनमध्ये काही प्रमाणात पाऊस झाला. मात्र जुलैमध्ये कमी पाऊस झाला. आता पुन्हापाऊस सुरू झाल्याने आजारांचे प्रमाण वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले.पावसाळ्यातील वातावरणामुळे माशांचे प्रमाण वाढते उघड्यावरील खाद्यपदार्थांवर माशा बसून, ते दूषित होतात. त्यामुळे असे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाबाच्या तक्रारी वाढतात. नागरिकांनी असे पदार्थ खाण्याचे टाळले पाहिजे.शहर व ग्रामीण रुग्णालयांमध्ये तपासणी व उपचारांची सुविधा आहे. त्यामुळे जलजन्य आजारांची लक्षणे दिसताच उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

नागरिकांनी दक्षता घ्यावी
सध्या ताप, घशाचे इन्फेक्शन, पोटदुखी, जुलाब-उलट्या अशी लक्षणे असणारी रुग्ण वाढले आहेत. ढगाळ हवामानामुळे व्हायरल फिवर आढळून येत आहे. ग्रामीण भागातून डेंग्यूसदृश्य रुग्णही येत आहेत. लहान मुलांच्या बाबतीत पालकांनी आणि शाळांनीही दक्षता घ्यावी.
– डाँ मंगेश पंचगाडे ,नांदगाव खंडेश्वर

शहरात दवाखाने हाऊसफुल्ल
तालुक्यात अनेक दवाखाने सध्या हाऊसफुल्ल असून, तापाची लक्षणे प्रामुख्याने आढळून येत असल्याने इंजेक्शन नंतर औषधे आणि वाफ देणे अशी धांदल प्रत्येक दवाखान्यातून दिसून येते. सकाळी नऊला सुरू झालेली ओपीडी रात्री उशिरा केव्हा संपेल याचा डॉक्टरानांही अंदाज येत नसल्याचे चित्र आहे. वाढत्या रुग्णांचा ताण दवाखान्यातील स्टाफवर येत असून, तेही घड्याळाच्या काट्याकडे न पाहता कामात व्यस्त असल्याचे चित्र आहे.
