अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी तालुक्यावर अन्याय
नागरिकांनी दिला रस्त्यावर उतरण्याचा स्पष्ट इशारा
नांदगाव खंडेश्वर/तालुका प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सध्या सुरळीत सुरू असलेले पाणी परीक्षण व गुणवत्ता तपासणी केंद्र इतर तालुक्यात स्थलांतरित करण्याच्या हालचाली अमरावती जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी सुरू केल्याने तालुक्यात तीव्र असंतोष पसरला आहे. हे केंद्र नांदगाव खंडेश्वर येथून हलविण्याचा प्रयत्न झाल्यास कोणत्याही परिस्थितीत तो हाणून पाडू आणि तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी दिला असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.अमरावती जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले पाणी परीक्षण व गुणवत्ता तपासणी केंद्र हे पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर परिसरात अनेक वर्षांपासून सुरू आहे.पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यात आल्यानंतर या केंद्रासाठी अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची इमारत देण्यात आली आहे. ही जागा अपुरी असल्याचे कारण पुढे करून अमरावती येथील संबंधित विभागाचे अधिकारी यांनी केवळ आपल्या सोयीसाठी हे कार्यालय तब्बल २५ ते ३० किमी अंतरावर असलेल्या दुसऱ्या तालुक्यात हलविण्याच्या हालचाली सुरू केल्या असल्याचा आरोप करण्यात येत आहे.विशेष म्हणजे सध्या ज्या ठिकाणी हे कार्यालय सुरू आहे त्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळी जागा उपलब्ध असून येथे प्रशस्त आणि स्वतंत्र इमारत उभारणे सहज शक्य आहे.असे असतानाही नांदगाव खंडेश्वर येथील पाणी परीक्षण व गुणवत्ता तपासणी केंद्र इतर तालुक्यात हलविण्याचा घाट हेतुपुरस्सर घालण्यात येत असल्याने प्रशासनाच्या हेतूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.पूर्वी हे कार्यालय अमरावती जिल्हा परिषदेत होते.अमरावती आणि नांदगाव खंडेश्वरमधील अंतर सुमारे ३५ किमी असल्याने तालुक्यातील नागरिकांना पाणी परीक्षणासाठी मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत होता.तब्बल १६१ खेडेगावे आणि ५८ ग्रामपंचायती असलेल्या व भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण तालुक्यासाठी हे कार्यालय नांदगाव खंडेश्वर येथे मंजूर करून आणण्यासाठी नागरिकांनी व तत्कालीन लोकप्रतिनिधींनी अनेक वेळा निवेदने व आंदोलने केली होती. त्यानंतरच हे केंद्र येथे सुरू करण्यात आले असून सध्या यामुळे तालुक्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात सोय होत आहे.नांदगाव खंडेश्वर तालुका आधीच विकासाच्या बाबतीत मागासलेला आहे.येथील अनेक शासकीय कार्यालये अमरावती येथे असल्याने तालुक्यातील नागरिकांना वारंवार मोठ्या अंतरावर जावे लागते.अशा परिस्थितीत तालुक्यात सुरळीत सुरू असलेले महत्त्वाचे पाणी परीक्षण व गुणवत्ता तपासणी केंद्र इतर तालुक्यात हलविणे म्हणजे नांदगाव खंडेश्वरच्या विकासावर आणखी एक घाला असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पाणी परीक्षण व गुणवत्ता तपासणी केंद्र नांदगाव खंडेश्वर येथेच सुरू ठेवण्याचे स्पष्ट आदेश अमरावती जिल्हा परिषदेच्या संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना द्यावेत अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशाराही निवेदनात सामाजिक कार्यकर्ते मोरेश्वर दिवटे यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे पालकमंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
