विविध समस्यांकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
अपूर्ण सुविधा व प्रशासकीय दुर्लक्षामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी
नांदगाव खंडेश्वर/ उत्तम ब्राम्हणवाडे
नांदगाव खंडेश्वर येथील तहसील कार्यालयात विगत काही दिवसांपूर्वी मोजक्याच कर्मचाऱ्यांसाठी केबिनची कामे पूर्ण करण्यात आली असून उर्वरित कर्मचाऱ्यांना केबिन उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून सर्वांना समान सुविधा देण्याची मागणी करण्यात येत आहे.तसेच चार नायब तहसीलदारांच्या केबिनमध्ये त्यांच्या टेबलामागे नावाचे फलक तसेच केबिनसमोर नावाच्या पाट्या लावण्यात आलेल्या नाहीत.यामुळे कार्यालयीन शिस्त व ओळख व्यवस्थापनात अडचणी निर्माण होत असून बाहेर गावावरून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना नायब तहसीलदार यांचे नाव विचारत विचारत जावे लागत असून नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाची नवीन व प्रशस्त इमारत असतानाही यामध्ये नियमित साफसफाई केली जात नसल्याचे चित्र दिसून येते.

त्यामुळे इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात कोळींची जाळी,धूळ आणि कचरा साचलेला आहे.त्याचप्रमाणे या तहसील कार्यालया लगत असलेल्या मीटिंग हॉलच्या आजुबाजूला आणि परिसरात झाडे व झुडपे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत त्यांची छाटणी न केल्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर या मीटिंग हॉलमध्ये वाढल्याचेही दिसून येत आहे. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.येथील शासकीय धान्य गोडाऊन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बसण्यास एका रूमची आवश्कता असून आणि बाहेर गावावरून येणाऱ्या रास्त दुकानदार यांच्याकरिता स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना अनेकदा पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे.तहसील कार्यालयासमोर बसविण्यात आलेल्या ध्वजस्तंभाभोवती स्टीलचे रेलिंग बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे नागरिक आपली दुचाकी वाहने ध्वजस्तंभाला लागून उभी करीत आहेत. यामुळे ध्वजस्तंभाला नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या संदर्भात तहसील प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकदा पत्रव्यवहार करूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.यामुळे रास्त दुकानदार यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.या सर्व समस्यांकडे तहसीलदार तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्याने लक्ष द्यावे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांसह संबंधित घटकांकडून करण्यात आली आहे.

सा.बा.विभागाचे उपअभियंता नेहमीच नॉट रिचेबल.
याबाबत नांदगाव खंडेश्वर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपभियता आगरकर यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही त्यांना नांदगाव खंडेश्वर येथील समस्या संदर्भात जेव्हा जेव्हा संपर्क साधला तेव्हा तेव्हा ते फोन उचलत नाहीत.आणि कोणत्याही समस्या सुद्धा सोडवत नाहीत ते आपल्या मुख्यालयी सुद्धा येत नाहीत विश्राम गृहांतील कर्मचाऱ्यास विचारणा केली असता त्यांचे नेहमी एकच उत्तर असते आणि ते म्हणजे साहेब कामावर भेट द्यायला गेले आहेत.साहेबांचे कामे कुठे आहेत हे आगरकर यांनाच माहित. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
